आम्ही कोर्टात गेलो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:35+5:302021-07-07T04:29:35+5:30
उत्तूर : आम्ही न्यायालयात गेलो ते आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाचे काम थांबवण्यासाठी नाही. आता प्रकल्पात पाणी तुंबले, आता पुनर्वसनाचे ...
उत्तूर :
आम्ही न्यायालयात गेलो ते आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाचे काम थांबवण्यासाठी नाही. आता प्रकल्पात पाणी तुंबले, आता पुनर्वसनाचे काय, असा सवाल करीत आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी आंबेओहोळच्या श्रेयवादाची लढाई आणि वस्तुस्थिती यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली.
२४ एप्रिल २०१७ ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या घडामोडींचा पत्रकार परिषदेत लेखाजोखा मांडण्यात आला.
यामध्ये १०० टक्के पुनर्वसन एकाही धरणग्रस्ताचे झालेले नाही. अर्धवट पुनर्वसन ३० धरणग्रस्तांचे झाले. ५६ प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. १५ भूमीहीनांना कोणताही मोबदला दिला नाही.
४६० स्वेच्छा पुनर्वसन खातेदारांपैकी ३७३ जणांचे स्वेच्छा पुनर्वसन झाले. ३० टक्के लोकांचे पेमेंट उचल झालेली नाही. संकलन दुरुस्तीसाठी तारीख पे तारीख दिली जाते. मात्र, संकलन दुरुस्ती झाली नाही. २८१ धरणग्रस्तांना १४१ प्लॉट लिंगनूर-कडगाव येथे उपलब्ध आहेत, त्याचेही वाटप झाले नाही. १०० टक्के पुनर्वसन कायदा डावलून प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. घळभरणी करून पाणीसाठा करणार, असे प्रकल्पग्रस्तांना सांगायला हवे होते. तसे सांगितले नाही. घळभरणीस परवानगी कुणी दिली याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
प्रकल्पात पाणीसाठा सुरू झाल्याने श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मात्र, पुनर्वसनाचे तीन-तेराच झाले आहे. पाणीसाठा करणार हे धरणग्रस्तांना सांगणे गरजेचे होते. आज उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. याला जबाबदार कोण, अशी विचारणा करण्यात आली आहे.
आंबेओहोळ धरणातील जलाशयाचे नाव रामकृष्ण जलाशय असे काही मंडळींनी ठेवून ग्रामविकासमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. हे धरणग्रस्त आहेत का याची विचारणा करून आम्ही ‘अश्रुसागर जलाशय’ असे नामकरण करू, असा इशारा देऊन प्रकल्पस्थळावर फलकही लावण्यात आला.
पत्रकार परिषदेला सदानंद व्हनबट्टे, महादेव खाडे, सरपंच संतोष बेलवाडे, राजा देशपांडे, सचिन पावले आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे ‘अश्रुसागर जलाशय’ असा फलक लावताना धरणग्रस्त.
क्रमांक : ०५०७२०२१-गड-०९