शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करू, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिले आश्वासन
By भीमगोंड देसाई | Published: June 14, 2024 01:26 PM2024-06-14T13:26:36+5:302024-06-14T13:27:38+5:30
मोठा पक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शक्तीपीठ मार्गाची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. विरोधी पक्ष या महामार्गा विरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र शासकीय पातळीवर मंत्री म्हणून शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकारांशी बोलताना दिले.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजप हा साहजिकच मोठा पक्ष आहे. त्यांना जास्त जागा मिळतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांना मिळणारच आहेत. इतर ठिकाणी निवडून येण्याचे मेरीट विचारात घेऊन चर्चा होऊन जागा वाटप होईल. निवडणुकीच्या पूर्वी अशा चर्चा होत असतात. कांद्याचा भाव, मराठा आणि इतर समाजाचा आरक्षण या विविध प्रश्नांमुळे राज्यात आम्हाला लोकसभेसाठी कमी मतदान झाले हे खरे आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अजित पवार गेले नव्हते
आरएसएसने अजित पवार यांच्यामुळे कमी मते मिळाल्याचे सांगितले. त्यावर कालच भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये अजित पवार गेले नव्हते, एकंदरीत देशात जी परिस्थिती झाली आहे ती मान्य करून विधानसभेत आपण दुरुस्त केले पाहिजे. ज्यावेळी पराभूत होतो त्यावेळी आमच्यावर धनशक्तीचा आरोप होतो. पण कोल्हापूरमध्ये विजय मिळवल्यानंतर तो लोकांमुळे आणि हातकणंगलेमध्ये पराभव झाला तो धनशक्तीमुळे, असे विरोधक म्हणतच असतात.