कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी संबंधितांशी बोलून मनपरिवर्तन करू - पालकमंत्री हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:28 PM2023-10-14T13:28:45+5:302023-10-14T13:29:49+5:30

कोल्हापूर : आमची सर्वांची अस्मिता असलेले कोल्हापूर हे शहर आहे. हे चोहोबाजूंनी विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या योजना आणि निधीची ...

We will change our mind by talking to the stakeholders for the expansion of Kolhapur says Guardian Minister Hasan Mushrif | कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी संबंधितांशी बोलून मनपरिवर्तन करू - पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी संबंधितांशी बोलून मनपरिवर्तन करू - पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : आमची सर्वांची अस्मिता असलेले कोल्हापूर हे शहर आहे. हे चोहोबाजूंनी विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या योजना आणि निधीची शहराला गरज आहे. परंतु केवळ लोकसंख्या कमी असल्यामुळे आपण त्यासाठी पात्र ठरत नाही. म्हणूनच शहराच्या विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या, शहरात मिसळलेल्या मोजक्या गावांमध्येच हद्दवाढ करण्याचे नियोजन आहे. १८ गावांना आम्ही महापालिकेत घेणार नाही. या सर्व संबंधितांशी दिवाळीनंतर बोलू आणि त्यांचे मनपरिवर्तन करू, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

सीपीआरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, या सर्वांचे जे गैरसमज झाले आहेत ते दूर करावे लागतील. पुणे, ठाणे येथील विकास योजना पाहिल्यानंतर शेजारची गावे आम्हाला शहरात घ्या म्हणून मागे लागली आहेत. त्यामुळे या सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. 

सीपीआरबाबत मुश्रीफ म्हणाले, मी या विभागाचा मंत्री म्हणून सूत्रे घेतल्यानंतर सीपीआरमध्ये कॅन्सर, होमिओपॅथी, संधीवात, थायरॉईड तपासणी, उपचार सेवा सुरू केली आहे. नांदेडच्या घटनेनंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणेलाच मजबूत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. नांदेडला ५०० खाटांच्या रुग्णालयात हजार जण दाखल होत होते. मनुष्यबळ कमी आहे. म्हणूनच आता उच्च न्यायालयाने वर्ग १ आणि २ ची पदे भरण्याचे आदेश एमपीएससीला दिले आहेत. यातूनही जागा रिक्त राहिल्या तर कंत्राटी भरल्या जातील. 

डॉक्टरांना शासकीय सेवेत येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. वर्ग ३ च्या जागांचे लेखी पेपर होऊन निकालही लागला आहे. ऑक्टोबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल. वर्ग चारच्या जागा तातडीने भरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सीपीआरमधील गैरप्रकारांबाबत चौकशी समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अवयवदानाची चळवळ हाती घेणार

शासकीय रुग्णालयातून लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार असून यासाठी रिलायन्स फाउंडेशन सहकार्य करणार आहे. अवयवदानाचे फायदे सांगणारी चळवळच मला आता हाती घ्यावी लागणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

Web Title: We will change our mind by talking to the stakeholders for the expansion of Kolhapur says Guardian Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.