जिल्ह्याचे राजकारण आम्हीच ठरवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:01 AM2018-02-19T01:01:20+5:302018-02-19T01:01:29+5:30
कळंबा : राजकारणास विधायक समाजकारणाची जोड दिल्यानेच महाडिक कुटुंबात सर्व मानाची पदे जनतेने दिली आहेत. शब्दास जागणारा, सर्वसामान्यांचा नेता अशी आपली प्रतिमा झाल्याने जिल्ह्याचे राजकारण महाडिकच ठरवणार, असे मत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केले. प्रभाग ७३ फुलेवाडी रिंगरोड येथील महेश्वर मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महाप्रसाद वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेजर वसंतराव देसाई होते.
कुरघोडीचे व सुडाचे राजकारण न करता विधायक काम करणे ही आपली वृत्ती आहे. जनतेच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे. भविष्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करू, असेही महादेवराव महाडिक म्हणाले. वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आयोजित महिलांच्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ व गुणवंतांचा सत्कार भगिरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. रविवारी महाप्रसादाचे वाटप खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारी सायंकाळी कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांच्या सत्संगाने कार्यक्रमाची सांगता झाली. वर्धापन सोहळ्याचे आयोजन विजयसिंह देसाई यांनी केले होते. कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, शिवसेना शहरप्रमुख सुजित चव्हाण, पृथ्वीराज सूर्यवंशी, मानसिंग पाटील, नगरसेविका रिया कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहन कापसे यांनी केले. नीलेश देसाई यांनी आभार मानले.