मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 12:06 PM2022-05-07T12:06:00+5:302022-05-07T12:06:32+5:30
भविष्यात चित्रपट, मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू
कोल्हापूर : मुंबई चित्रनगरीच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहेच, पण चित्रीकरणासाठी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करून ती चोवीस तास सुरू राहील, अशा पद्धतीेने चित्रीकरणासाठी पुन्हा नावारुपाला आणू. भविष्यात चित्रपट, मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी दिली.
राजर्षी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात होत असलेल्या महाराष्ट्र राज्य हीरक महोत्सवी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, जयंत आसगावकर, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अभिनेते किशोर कदम उपस्थित होते.
अमित देशमुख म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मुंबईनंतर कोल्हापूर चित्रीकरणासाठी नावारुपाला येईल. येथे रात्रंदिवस चित्रीकरण सुरू राहायचे असेल तर कोल्हापूर - मुंबई, हैदराबाद, चेन्नई विमानसेवा सुरू व्हायला हवी. राज्यातील दुर्मीळ वाद्यांचे जतन होण्यासाठी त्यांचे संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न आहे.
कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात चित्रीकरण सुरू असून येथील चित्रपट वारसा जपण्यासाठी मुंबईप्रमाणे चित्रनगरीचा विकास व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. तसेच मंत्री देशमुख यांनी शाहू कृतज्ञता पर्वसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
विजेत्या संघाचे देशभर प्रयोग
यावेळी मंत्री देशमुख म्हणाले, राज्य नाट्य अंतिम स्पर्धेतील विजेत्या संघाचे देश, परदेशात प्रयोग व्हावेत, यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय काम करणार आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बनवलेल्या सांस्कृतिक धोरणाचे पुनरावलोकन करून कला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी योगदान देणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुरातत्व वास्तू असल्याने विभागाने या वारस्याचे संवर्धन करण्यासाठी निधी द्यावा, असेही ते म्हणाले.