रखडलेले बांधकाम परवाने सोमवारपासून मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:26+5:302021-03-13T04:46:26+5:30

कोल्हापूर : रखडलेले बांधकाम परवाने देण्याचे काम सोमवार (दि.१५) पासून गतीने केले जाणार असल्याचे माहिती महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी ...

We will get rid of the stalled construction permits from Monday | रखडलेले बांधकाम परवाने सोमवारपासून मार्गी लावू

रखडलेले बांधकाम परवाने सोमवारपासून मार्गी लावू

Next

कोल्हापूर : रखडलेले बांधकाम परवाने देण्याचे काम सोमवार (दि.१५) पासून गतीने केले जाणार असल्याचे माहिती महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी दिली. रविवारपर्यंत निवडणुकीचे काम पूर्ण होणार असून नगररचना विभाग पूर्ण क्षमतेने सुरू होईल. विशेष शिबिर घेऊन परवानगी तात्काळ देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकामध्ये ‘३९ लाख चौरस फुटांवरील बांधकामे रखडली’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. परवानाअभावी बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींची वस्तुस्थिती मांडली होती. यासंदर्भात त्यांनी महापालिकेची भूमिका स्पष्ट केली.

युनिफाइड प्रणालीला मंजुरी, मुद्रांक शुल्कात सवलत आणि घरांची वाढती मागणी यामुळे बांधकाम क्षेत्राला अच्छे दिन येतील, असे अपेक्षित असताना महापालिकेतील नगररचना विभाग (टिपी) ढिसाळ कारभाराचा फटका बसत आहे. ३५० पेक्षा जास्त परवाने प्रलंबित असल्याने बांधकाम प्रकल्पांची सुरुवात थांबली आहे. मार्च महिन्यात परवानगी मिळणे आवश्यक होते. मात्र, येथील कनिष्ठ अभियंता, सर्व्हेअर महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या कामासाठी गुंतले आहेत. यामुळे परवानगी रखडली आहे.

चौकट

‘टिपी’मध्ये शुकशुकाट

बांधकाम परवानगीसाठी नेहमी नागरिकांनी गजबजलेले टिपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट आहे. काही अधिकाऱ्यांनी कार्यालय बंद केले असून इलेक्शन ड्यूटी असे फलक लावले आहेत. बहुतांश कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. काही कर्मचारी निवडणूक कामाचे निमित्त करून घरी जात असल्याचेही समोर येत आहे.

कर्मचारी दुहेरी संकटात

महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागणार असल्याने विकासकामांचा सपाटा लावला आहे. एकीकडे प्रकल्प विभागातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असून दुसरीकडे त्यांना विकासकामे तात्काळ करण्यासाठी काहींकडून दबाव टाकला जात आहे. निवडणूक कामात चूक झाल्यास कारवाई तर विकासकामांच्या फाइल मार्गी लावल्या नाही, तर लोकप्रतिनिधींकडून ‘सरबत्ती’ अशा दुहेरी संकटात कर्मचारी आहेत.

महापालिकेतील कर्मचारी दबावात

निवडणूक कामकाज, कोरोना उपाययोजना, लसीकरण, वसुलीचे उद्दिष्टे पूर्ण करणे, अंदाजपत्रक करणे अशी विविध कामे एकाच वेळी करण्याची वेळ महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांवर आली आहेत. कामाचा ताण वाढल्याने कर्मचारी दबावामध्ये आहेत.

Web Title: We will get rid of the stalled construction permits from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.