कोल्हापुरात कामगार उपायुक्त कार्यालय करू, कामगार मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:28 PM2022-05-24T12:28:43+5:302022-05-24T12:29:05+5:30

बांधकाम कामगार यांच्यासाठी मेडिक्लेम योजना नव्या स्वरूपात सुरू करण्याचाही विचार

We will have an office of Deputy Commissioner of Labor in Kolhapur, informed the Minister of Labor Hasan Mushrif | कोल्हापुरात कामगार उपायुक्त कार्यालय करू, कामगार मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

कोल्हापुरात कामगार उपायुक्त कार्यालय करू, कामगार मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

Next

कागल : कोल्हापूर शहरात कामगार खात्याचे उपायुक्त कार्यालय सुरू करण्याबद्दल आपण प्रयत्न सुरू केले असून, लवकरच हे कार्यालय सुरू होईल, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी मंत्री मुश्रीफ यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. तेव्हा हे आश्वासन दिले.

बांधकाम कामगार यांच्यासाठी मेडिक्लेम योजना नव्या स्वरूपात सुरू करण्याचाही विचार सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. जिल्हा अध्यक्ष कॉ. भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भेटले.

जिल्ह्यामध्ये संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल पंचतारांकित, गोकुळ शिरगाव व शिरोली या औद्योगिक वसाहती आहेत. वस्त्रोद्योगसारखा मोठा व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत कामगारांना लहानसहान कामांसाठी पुणे वारी करावी लागते, ते परवडणारे नाही. एवढे मोठे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कामगार विभागाचे उपायुक्त कार्यालय व्हावे, असे संघटनेकडून सांगण्यात आले. बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना सुरू करावी.

ज्या कामगारांना अद्याप कोविड, अनुदान मिळालेले नाही, त्यांना कोविड अनुदान देण्यात यावे, लाभ वाटपाचे सर्व अधिकार स्थानिक कार्यालयांना देण्यात यावेत, मध्यान्ह भोजन योजनेमध्ये सुधारणा करावी, या मागण्यांसह १९ मागण्या केल्या आहेत.

यावेळी विक्रम खतकर, मोहन गिरी, दगडू कांबळे, राजाराम आरडे, बापू कांबळे, कुमार कागले, विजय कांबळे, जोतिराम मोंगने, संतोष शेटके, शिवाजी लोहार, गौस नायकवडी, परसू कांबळे उपस्थित होते.

१३१ कामगारांची घरकुल योजना

  • महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना मंजूर केली होती. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नव्हती.
  • हसन मुश्रीफ हे कामगार मंत्री झाल्यानंतर या योजनेमध्ये लक्ष घालून जिल्हयातील साधारण १३१ कामगारांची घरकुल योजना मंजूर करून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांना अभिनंदनाचे पत्र संघटनेच्यावतीने देण्यात आले.

Web Title: We will have an office of Deputy Commissioner of Labor in Kolhapur, informed the Minister of Labor Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.