Kolhapur: शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठीच आग्रही राहू, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
By इंदुमती सूर्यवंशी | Published: June 18, 2024 06:14 PM2024-06-18T18:14:07+5:302024-06-18T18:15:06+5:30
'तुम्हाला महामार्ग रेटायचाच आहे का?'
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गविरोधात फक्त कोल्हापूरकरच नव्हे तर वर्धा ते गोव्यापर्यंतच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध आणि असंतोष लोकसभेला मतपेटीतून देखील व्यक्त झाला आहे. त्यामुळे मी उद्या मुंबईला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना हा विषय सांगेन. त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द करण्यासाठीच आग्रही राहीन अशी ग्वाही आज, मंगळवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शक्तीपीठ महामार्गविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, राजूबाबा आवळे, माजी आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, गिरीष फोंडे, विजय देवणे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अमाेल येडगे व पालकमंत्री मुश्रीफ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. खासदार शाहू छत्रपती यांनी महामार्गामुळे अनेक नागरिक भूमिहीन होणार असल्याने तो रद्द करावा असे मत मांडले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी, व नागरिकांचा तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आले असताना विधिमंडळ सदस्यांनी महामार्ग रद्द करण्याची मागणी केली होती. यासह माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, भाजपचे कार्यकर्ते तसेच मी स्वत: असे महायुतीचे घटक पक्षदेखील यासाठी आग्रही आहेत त्यामुळे मी उद्या मुंबईत जाताच या विषयावर चर्चा होईल. सध्या भुसंपादनाच्या नोटिसा दिल्या जात असल्या तरी त्या आधी काढलेल्या आहेत. नव्याने नोटिसा काढलेल्या नाहीत.
तुम्हाला महामार्ग रेटायचाच आहे का?
सतेज पाटील जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, पालकमंत्री स्वत: महामार्गाच्या विरोधात आहेत, जनतेचा प्रक्षोभ असताना दुसरीकडे प्रशासनातील तलाठी शेतकऱ्यांना नोटिसा देत आहे. म्हणजे तुम्हाला महामार्ग रेटायचाच आहे का, शिरोळ, कागल येथे नोटिसा चिकटवल्या जात आहेत. विरोध केला तरी तलाठी ऐकत नाहीत. तुम्ही आम्हाला शांत राहायला सांगता आणि नोटिसा काढता. तुम्हाला महामार्ग रेटून न्यायचाच असेल तर तसे सांगा, मग काय करायचे ते आम्ही ठरवू. अधिवेशनात महामार्गाचा निर्णय होईपर्यंत नोटिसा काढू नयेत. यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी मी तलाठ्यांना तसे आदेश देईन असे सांगितले.