‘कोल्हापूर-वैभववाडी’बाबत योग्य निर्णय घेऊ

By admin | Published: September 25, 2015 12:19 AM2015-09-25T00:19:18+5:302015-09-25T00:28:14+5:30

सुरेश प्रभू : चंद्रदीप नरके यांना लेखी आश्वासन

We will make right decisions about 'Kolhapur-Vaibhavwadi' | ‘कोल्हापूर-वैभववाडी’बाबत योग्य निर्णय घेऊ

‘कोल्हापूर-वैभववाडी’बाबत योग्य निर्णय घेऊ

Next

कोल्हापूर : कोल्हापूर ते वैभववाडी या कोकण रेल्वे प्रकल्पासह अन्य पर्यायी रेल्वेमार्गांबाबत अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आमदार चंद्रदीप नरके यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे.
आमदार नरके यांनी ९ सप्टेंबरला केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांना नवी दिल्लीमध्ये भेटून विविध रेल्वेमार्गांच्या मागणीचे पत्र दिले होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर हे धार्मिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच व्यापारी व पर्यटकदृष्टीने कोकण गोव्याशी जवळ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूर हे कोकण रेल्वेशी जोडावे, अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
कोल्हापूर ते गोवा व्हाया गगनबावडा-वैभववाडी हा नवीन रेल्वे मार्ग जवळचा असल्याने याबाबत मंत्रालयाने तातडीने विचार करावा, अशी मागणी आमदार नरके यांनी केली. या नवीन रेल्वेमार्गाच्या जवळ दोन साखर कारखाने, एक सूतगिरणी तसेच गगनगिरी हे ऐतिहासिक ठिकाण असून विजयदुर्ग आणि आनंदवाडी बंदरामार्गे व्यापारी देवाण-घेवाण होत असते. हा मार्ग झाल्यास आयात-निर्यात व्यापाराला चांगला फायदा होणार आहे. सध्या गगनबावडा कोकण-गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. हा मार्ग झाल्यास वाहतुकीचे आणि अपघाताचे प्रमाण कमी होणार असल्याचे नमूद केले होते. मुंबई-गोवा मार्गाला कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी मार्ग पर्याय ठरणार आहे. तसेच गुंटकल-सोलापूर-बेळगांव-कोल्हापूर-वैभववाडी आणि मिरज-कोल्हापूर-वैभववाडी-मुंबई हे नवीन पर्यायी मार्ग रेल्वेला उपयुक्त ठरणारे आहेत. रेल्वे खात्याने यापूर्वी केलेल्या सर्व्हेमध्ये कोल्हापूर ते रत्नागिरी हे २११ किलोमीटरचे अंतर दिसून आले.
प्रस्तावित कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी या रेल्वेमार्गाचे अंतर केवळ ६० किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती आमदार नरके यांनी मंत्री प्रभू यांना पत्राद्वारे केली. त्यावर मंत्री प्रभू यांनी गोवा-मुंबई या कोकण रेल्वेला पावसाळ्यात पर्याय ठरणाऱ्या नवीन रेल्वेमार्गाबाबत योग्य निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले.

Web Title: We will make right decisions about 'Kolhapur-Vaibhavwadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.