अवघाचि संसार सुखाचा करीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:17 AM2018-07-07T01:17:15+5:302018-07-19T13:25:51+5:30

 We will make the whole world happy. Dindi walking. | अवघाचि संसार सुखाचा करीन

अवघाचि संसार सुखाचा करीन

googlenewsNext

आळंदीहून माउली आज पंढरीच्या भेटीला निघाल्या. लोकसंग्रह हा अनेक कारणांसाठी केला जातोे; परंतु संत लोकसंग्रह करतात ते आयुष्याची उंची वाढविण्यासाठी. व्यवहारी जगातला लोकसंग्रह हा संघर्षासाठी असतो किंवा व्यवहारी संपदेसाठी असतो. व्यवहारी सोहळे हे तत्कालीन असतात. सोहळा संपल्यानंतर हा लोकसंग्रह रिक्तता आणतो; मात्र ईश्वरी सत्तेच्या भेटीसाठीचा लोकसंग्रह हा दिव्यत्वासाठी असतो. हा सोहळा संपला तरी त्यातून मिळालेला आनंद हा स्थायी असतो. कारण या सोहळ्याचा हेतू ‘लेना देना बंद है, फिर भी आनंद है’ या सूत्रावर चालणारा असतो.
माउली या सुखाच्या सोहळ्यासाठी जाण्याचा हेतू स्पष्ट करताना म्हणतात.
‘अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।।
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ।।३ ।।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करूनी राहे ।।४।।
हा माउलीचा अभंग निव्वळ अभंग नसून ती एक प्रतिज्ञा आहे. अवघ्या जगाला सुखी करण्यासाठी केलेली. यामधून माउली दु:ख आणि दु:खीवृत्ती कवटाळून बसलेल्यांना दु:खाला खूप मोठं न समजता राहायला सांगून म्हणतात की, ‘मी अवघा संसार सुखाचा करीन, सर्वत्र आनंद भरीन.’ माझं जे माहेर आहे पंढरपूर जिथे सर्व आनंदाचे भांडार आहे. पांडुरंग नावाचा जो आनंदाचा कंद आहे, त्याला मी भेटेन. मी जे काही पुण्य केलंय ते फलद्रुप करीन आणि माझ्या पांडुरंगाला मिठी मारीन आणि त्यावेळेला त्याला मिठी मारीन त्यावेळी मीही त्याच्याशी साम्यरूप होईन. तो आनंदस्वरूप आहे. मग मीही आनंदस्वरूपच होऊन जाईन.
व्यवहारी जगामध्ये आमची धावाधाव सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य यासाठी असते. लोकांची धावाधाव आनंदासाठी असते. जर सत्ता, संपत्तीमध्ये आनंद एकवटला असता तर लोकांनी पालख्या सत्ताधीशांच्या किंवा श्रीमंतांच्या उचलल्या असत्या, पण वास्तवता ही आहे की, सत्ता, संपत्ती हे क्षणभंगूर आहे. आजचा सत्ताधीश उद्या सामान्य होणार आहे. आजीचा माजी होणार आहे. आजचा संपत्तीचा मालक उद्या कपल्लकही होऊ शकतो. म्हणजे ते क्षणिक आनंद देतात. जे माजी होणार आहेत त्यांच्या निघतात त्या मिरवणुका, पण जे शाश्वत आनंद देतात, विचारांची उंची देतात, चित्तशुद्धतेचा ध्यास घेऊन जीवनात निर्मलता आणतात, भेदाभेद संपवून मानवतेचा ध्यास घेऊन जगतात त्यांच्याच पालख्या उचलल्या जातात. त्यांचेच पाऊल डोक्यावर घेतात. जे कधीही माजी होत नाहीत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर कधीही माजी होत नाहीत. त्यांचे जीवन तत्त्वज्ञान आणि कार्य हे अवघ्यांच्याच कल्याणासाठी असते. म्हणून त्यांच्या पालख्या निघतात. कारण त्यांच्याजवळ जे असते तेच ते तो जगाला देतो. दु:खी माणूस दु:खच देतो. क्रोधी माणूस क्रोध पसरवतो, लोभी लोभ. पण संतांच्या हृदयात केवळ आनंदच असतो. त्यामुळे ते आनंदच देतात. म्हणून माउली म्हणतात, मी जो संसार करणार आहे सुखाचाच करणार आहे. यामध्ये दु:खाचा लवलेशही असणार नाही. सुखाचा करून मी एकटाच सुखी होणार नाही. तर अवघे जग मी सुखी करणार आहे. आनंदी करणार आहे. संतांच्या जगण्याचा हेतूच मुळामध्ये विशाल असतो. डोक्याने मोठा तो संत आणि हृदयाने मोठा तो संत असे म्हणतात. संत आपल्या ब्रीदावलीला जागतात. माझ्यासारख्यांची ब्रीदावली स्वार्थी असते. मी म्हणतो, अवघाचि संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीन. माझा संसार एकट्याच्या सुखाचा विचार करतो; परंतु संतांचा संसार अवघ्यांचा असतो. माउलींच्या भाषेत सांगायचे झाले तर..
ते वाट कृपेची पुसतु ।
दिशाची स्नेहेची भरितु ।।
जीवातळी अंथरितू ।
जीव आपुला ।।
संत जिथे जातात तिथे स्नेह, प्रेम, मानवी जीवनाची उच्चतम मूल्ये घेऊन जातात. प्रेमाने जग बदलतात. दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्या जिवालाही अर्पण करण्यासाठी उत्सुक असतात. आपली काया जगामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी झिजवतात. आपल्या संवेदनशील करुणेच्या प्रेरणेने आर्तांची दु:खे संपवून त्याचे सोयरे बनून वाटचाल करतात. लौकिक आणि अलौकिकसाठी ते सोबती बनून बोटाला धरून मार्ग चालवतात आणि स्वत:ही चालतात.

(लेखक इंद्रजीत  देशमुख हेसंत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title:  We will make the whole world happy. Dindi walking.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.