ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे : सुविधा वाढवण्यावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 07:23 PM2020-09-08T19:23:14+5:302020-09-08T19:25:18+5:30
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असेल त्यासाठी मी स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहे. रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी माझ्या निधीतून २२ लाख रूपये वापरण्यात यावेत, मात्र, प्रशासनाने अधिक अधिक सजग राहून नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी केली.
कोल्हापूर : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असेल त्यासाठी मी स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहे. रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी माझ्या निधीतून २२ लाख रूपये वापरण्यात यावेत, मात्र, प्रशासनाने अधिक अधिक सजग राहून नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी केली.
कोल्हापुरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. रुग्णांकरिता कोणत्या हॉस्पिटल मध्ये, नेमके किती बेड शिल्लक आहेत? याची माहिती उपलब्ध असली पाहिजे. त्याकरिता प्रत्येक हॉस्पिटलच्या समोर डिजिटल डिस्प्ले असला पाहिजे.
बी के सी, ठाणे, पुणे च्या धर्तीवर कोल्हापुरातही जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर उभे करण्यात यावे. कोल्हापूर महानगर पालिका आणि जिल्ह्याला तात्काळ जास्तीत जास्त मदत करण्यात यावी अशी मागणी घेऊन आज नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. pic.twitter.com/6QocrKI1SD
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 4, 2020
जिल्हाधिकारी कार्यालयाने बेड उपलब्धतेची माहिती लोकप्रतिनिधींकडेसुद्धा दिली पाहिजे. जेणेकरून आम्ही सुद्धा रुग्णांना मदत करू शकू. अधिक सुविधेसाठी एक ॲप्लिकेशन तयार करून त्याचा प्रभावी वापर केला पाहिजे. मदतनिधी जमा करण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांनी खाते उघडून ते सार्वजनिक केले पाहिजे. काही संस्थांकडून वस्तूंच्या स्वरूपात मदत स्वीकारली पाहिजे. जसे ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई किट, काही औषधे वगैरे. आजच्या ह्या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत.
पाच लाखांचे बिल झाले दीड लाख
खासगी दवाखान्यांकडून रुग्णांची पिळवणूक करून लाखो रुपयांचे बिल केले जात आहे. मी फोन केल्यावर एका रुग्णाचे ५ लाखांचे बिल दीड लाख इतके कमी करण्यात आले. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांची दक्षता टीम बनवून यावर नियंत्रण आणावे, अशी सूचना संभाजीराजे यांनी केली.