राधानगरीची भूमी मंगळवारी गोमूत्र शिंपडून पवित्र करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:20+5:302021-06-28T04:18:20+5:30
मुरगुड : मुरगूडच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा पाणी-पाणी करायला लावणाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित ...
मुरगुड : मुरगूडच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा पाणी-पाणी करायला लावणाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, अशी विनंती आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज म्हणून डांगोरा पिटणाऱ्यांना केली होती. परंतु; आमची ही विनंती धुडकावत त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिवशीच ती पवित्र भूमी कलंकित केली. ती पुन्हा पवित्र करण्यासाठी मंगळवारी (ता.२९) आम्ही गोमूत्र शिंपडण्याचा मुहूर्त शोधला आहे. त्याप्रमाणे गोमूत्र शिंपडून त्यांनी कलंकित केलेली ही भूमी पवित्र करणार आहोत, असे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुरगुड शहरातील कार्यकर्त्यांनी काढले आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राजर्षी शाहू महाराजांची जयंती शनिवार दि.२६ जुलै रोजी झाली. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी स्वतःचा खजिना रिकामा करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कुठे आणि त्यांच्या जनक घराण्याचे वंशज म्हणून घेणारे, आम्हा मुरगूडकर जनतेला पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करायला लावणारे हे कुठे? हा आमचा मूळ सवाल आहे. त्यामुळेच किमान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिवशी तरी त्यांनी त्या पवित्र भूमीत पाय ठेवू नये, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. एरवी त्यांनी तिथे जाऊन महिनाभर जरी राहिले तरी आमचा कोणताही आक्षेप नाही.
या पत्रकावर माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगुले, नगरसेवक रविराज परीट, राष्ट्रवादीचे मुरगूड शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगुले, कॉम्रेड अशोक चौगुले, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राजू आमते, माजी नगरसेवक नामदेव भांदीगरे, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी, अमित तोरसे, प्रणव ऊर्फ विकी बोरगावे, नंदकिशोर खराडे, किरण चौगुले, समाधान चौगुले आदी प्रमुखांच्या सह्या आहेत.