‘सिंचन’च्या संशयितांना खडी फोडायला पाठवू

By admin | Published: October 26, 2015 12:47 AM2015-10-26T00:47:33+5:302015-10-26T00:49:07+5:30

राम शिंदे : काँग्रेस-राष्ट्रवादीला चीत करून भाजप-ताराराणी सत्तेवर येणार; आदर्श घोटाळ्याचीही चौकशी सुरू

We will send 'irrigation' suspects to the boiler | ‘सिंचन’च्या संशयितांना खडी फोडायला पाठवू

‘सिंचन’च्या संशयितांना खडी फोडायला पाठवू

Next

कोल्हापूर : ‘आदर्श’ व ‘सिंचन’ घोटाळ्यांतील संशयितांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. लवकरच त्यांना जेरबंद करून जेलमध्ये खडी फोडायला पाठवू; त्याशिवाय लोकांना खऱ्या अर्थाने भाजपचे सरकार आल्यासारखे वाटणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रविवारी रात्री केले. सत्ताधारी
कॉँगे्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करून भाजप-ताराराणी आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मिरजकर तिकटी येथे भाजप-ताराराणी आघाडी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस राहुल चिकोडे, पुण्याच्या नगरसेविका मुक्ता टिळक, नगरसेवक आर. डी. पाटील यांच्यासह उमेदवार अजित ठाणेकर, संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी, सुनंदा सुनील मोहिते, मेहजबीन सुभेदार, श्रुती पाटील उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रभागांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. लोकांना मतदानासाठी धमक्या दिल्या जात आहेत. जर कोणी अशा पद्धतीने अन्याय, अत्याचार करीत असेल तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल, त्यासाठीच आपण कोल्हापुरात आलो आहे, असा इशाराही मंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. भाजपचे सरकार लोकाभिमुख असून लोकांनी निर्भयपणे मतदानाला सामोरे जावे. कोणीही दमदाटी, दबाव आणि पैशांचा वापर करीत असेल तर याबाबत पोलीस व शासन सतर्क असून ते याचा चोख बंदोबस्त करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कॉँग्रेसला देशात साधा विरोधी पक्षही होता आले नसल्याची त्यांनी खिल्ली उडविली.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून थेट पाईपलाईन योजनेचे भांडवल केले जात आहे; परंतु ही योजना फक्त आखली आहे. प्रत्यक्षात अमलात आणलेली नाही. त्यामुळे जनतेला फसविणाऱ्यांना या निवडणुकीत आम्ही आता ‘थेट’ घरी बसवायचीच योजना आखल्याचा टोला शिंदे यांनी हाणला.
ते म्हणाले, भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून विविध लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. राज्यातील ६२ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूरचा टोलही बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने काहीच केले नाही. मात्र, चंद्रकांतदादांनी ३० कोटी रुपयांचा निधी आणला.
यावेळी पुण्याच्या नगरसेविका मुक्ता टिळक, महेश जाधव, आर. डी. पाटील, राहुल चिकोडे, नचिकेत भुर्के यांनी मनोगत व्यक्त केले.
अजित ठाणेकर यांनी आभार मानले. दरम्यान, मैलखड्डा (संभाजीनगर), सिद्धार्थ चौक (जिल्हा परिषद कंपौंड परिसर) येथेही गृहराज्यमंत्री प्रा.
राम शिंदे यांनी सभा घेतल्या. (प्रतिनिधी)

बाराशे कोटींचा निधी टक्केवारीसाठी
महापालिकेत विकासासाठी बाराशे कोटींचा निधी आणल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तो निधी टक्केवारीसाठीच आणल्याचा आरोप आर. डी. पाटील यांनी केला. या निधीतील पन्नास टक्के म्हणजे सहाशे कोटी रुपये हे कर्जरूपाने घेतले आहेत. त्याचा बोजा महापालिकेवर असून पुढील शंभर वर्षे हे कर्ज फिटणार नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.


‘राष्ट्रवादी’च्या ‘कारभाऱ्या’कडून दहशत
बिंदू चौक येथे वाहनतळाचा ठेका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘कारभाऱ्याने’ दहशत माजविली आहे. त्यांच्यासह समर्थकांनी उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी नगरसेवक आर. डी. पाटील यांचा दाखला फाडला आहे, असा आरोप करत काही प्रभागात धुमाकूळ घालून दहशत माजविण्याचा प्रकार सुरू असून, गृहराज्यमंत्री शिंदे यांनी याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महेश जाधव यांनी केली.

Web Title: We will send 'irrigation' suspects to the boiler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.