मुख्यमंत्री कोण हे एकत्र बसून ठरवू, भाजपाची उद्धव ठाकरेंना ऑफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:59 PM2018-06-20T15:59:10+5:302018-06-20T17:12:28+5:30
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात राज्यातील पुढचा मुख्यमंत्री शिवसेनाचाच असेल, अशी गर्जना केली होती.
कोल्हापूर : महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण असेल ते भाजप व शिवसेना असे दोघे मिळून एकत्र बसून ठरवूया अशी आॅफर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिली.
मुंबईत मंगळवारी झालेल्या शिवसेना स्थापना दिवस मेळाव्यात ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे जाहीर केले होते. त्यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता मंत्री पाटील म्हणाले,‘मुख्यमंत्री आपलाच असेल असे प्रत्येक पक्षच म्हणत असतो. परंतू गेल्या निवडणूकीत तो भाजपचा झाला. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री कोण असेल ते भाजप व शिवसेना अशा दोघांनी एकत्रित मिळून ठरवूया,अन्यथा युतीतील भांडणात काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होईल.’
शिवसेना भाजपबरोबर युती करणार नाही असे वारंवार सांगत असतानाही मंत्री पाटील मात्र सातत्याने या दोन्ही पक्षांची युती झाली पाहिजे असा आग्रह धरत आहेत. गेल्या महिन्यांतही त्यांनी ही युती नाही झाली तर महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल व त्यांनी काय पध्दतीचे राज्य केले होते, त्याचा अनुभव राज्याने घेतला आहेच अशी टिप्पण्णी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपमधूनही नाराजी व्यक्त झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापुरात गुरुवारी मुख्यमंत्र्यांना ‘आऊटस्टँडिंग चिफ मिनिस्टर’ असा उपहासात्मक पुरस्कार देवून आंदोलन करणार असल्याचे निदर्शनास आणून दिले असता मंत्री पाटील म्हणाले,‘आपला देश खूप सुंदर आहे. कारण येथे प्रत्येकाला कोणतेही आंदोलन करण्याची मुभा आहे. परंतू मुख्यमंत्र्यांचे कामच इतके जोरात सुरु आहे की राष्ट्रवादीच्या या आंदोलनाचे जनतेत हसे झाल्याशिवाय राहणार नाही.’