बसस्थानकाच्या नामकरणासंदर्भात पुढील बैठकीत निर्णय घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:32+5:302021-03-04T04:43:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक असे नामकरण करावे, या मागणीसाठी आ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक असे नामकरण करावे, या मागणीसाठी आ. प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यावेळी मंत्री परब यांनी याप्रश्नी लवकरच व्यापक बैठक घेऊन त्यावर मार्ग काढू, अशी ग्वाही दिली.
येथील बसस्थानकास महाराजांचे नाव द्यावे, या मागणीसाठी आ. आवाडे यांनी शनिवारी (दि.२७) ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी मुंबईत मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी बैठक झाली; परंतु मंत्री पाटील आजारी असल्याने बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत पुन्हा व्यापक बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत, अरुण मस्कर, उत्तम रवंदे, संतोष चव्हाण आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी
०२०३२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीतील बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, या मागणीसाठी आ. प्रकाश आवाडे यांनी मंत्री अनिल परब यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.