वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:21 PM2020-05-09T17:21:54+5:302020-05-09T17:24:08+5:30
कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना दिले.
कोल्हापूर : कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना दिले.
पश्चिम घाट आणि कोकण क्षेत्राच्या विकासाच्या संभाव्यतेचा विचार करता कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गाची उभारणी अत्यंत महत्त्वाची आहे. या रेल्वे मार्गाचे काम बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असल्याने या मार्गास आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून हा मार्ग लवकरात लवकर कार्यान्वित करावा, अशी मागणी प्रा. मंडलिक यांनी रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांच्याकडे केली.
त्याचबरोबर शाहूपुरी भाजी मार्केट येथे फूट ओव्हर ब्रीजकरिता ईलीव्हेटर बसवावे, पुणे ते मिरज दरम्यान लोहमार्गाचे डबलिंगचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित मिरज ते कोल्हापूर दरम्यानचे डबलिंगचे काम पूर्ण व्हावे, रेल्वेला व्यावसायिक फायद्याच्या दृष्टीने कोल्हापूर ते पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या जास्त असल्या कारणाने कोल्हापूर ते पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करून अस्तित्वातील ट्रेनचा प्रवास योग्य वेळेच्या वेगात वेगवान आंतर-गाडीने सुरु करावी.
या मागणीचे निवेदन राज्यमंत्री अंगडी यांच्याकडे केली. यावर आपण या सर्व गोष्टींमध्ये व्यक्तिगत लक्ष घालत असून, कोल्हापूर रेल्वे संदर्भातील मागण्या प्रामुख्याने पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी प्रा. मंडलिक यांना दिले.