वाघजाई डोंगरावरील स्थानिकांच्या जमिनी बळकावणाऱ्यांना धडा शिकवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:21 AM2021-07-17T04:21:04+5:302021-07-17T04:21:04+5:30
कोपार्डे : करवीर व पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरावर दोन्ही तालुक्यातील १२ गावातील शेतकऱ्यांना छत्रपती शाहू महाराजांनी जमिनी दिल्या होत्या. ...
कोपार्डे : करवीर व पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरावर दोन्ही तालुक्यातील १२ गावातील शेतकऱ्यांना छत्रपती शाहू महाराजांनी जमिनी दिल्या होत्या. पण प्रकल्पग्रस्तांच्या अडून त्या हडप करण्यास धनदांडग्या व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांची कूळवहिवाट असूनही राजकीय व प्रशासकीय वजन वापरून या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याने त्याविरोधात आता तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच शिवाजी कांबळे यांनी दिला.
भामटे, ता. करवीर येथे ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच कांबळे म्हणाले, १९७३ ला वाघजाई डोंगरावर प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यात आली होती. पण या जमिनी प्रकल्पग्रस्तांनी सर्व क्षेत्र कोरडवाहू व येथे वीज, पाणी, रस्त्याच्या गैरसोयी असल्याने नाकारल्या होत्या. यामुळे त्यांना इतर ठिकाणी पुनर्वसन करून जमिनी दिल्या आहेत. पण त्यावेळी शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या नावे काढण्यात आलेला आदेश तसाच राहून गेल्याने या प्रकल्पग्रस्तांच्या नावे वाघजाई डोंगरावरील जमिनी तशाच राहिल्या आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांना गाठून त्या जमिनी पैशाचे आमिष दाखवून खरेदी करण्याचा सपाटा प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. सरकारी हक्कातील व शेतकऱ्यांच्या कूळवहिवाट असणाऱ्या जमिनी खरेदी करून शेतकऱ्यांना भूमिहीन केले जात आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी उपसरपंच भगवान देसाई म्हणाले. प्रकल्पग्रस्तांनी त्यावेळी कब्जा घेणे आवश्यक होते पण गेली ४० वर्षे त्यांनी जमिनीचा कब्जा घेतलेला नाही. प्रकल्पग्रस्त व माजी सैनिकांना दिलेल्या जमिनी विकता येत नाहीत, पण विक्रीचा प्रकार सुरू आहे ॲट्रॉसिटीची भीती दाखवून शेतकऱ्यांना हाकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबले नाही तर डोंगरावर सहकुटुंब आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शेतकरी कृष्णात साळुंखे, तानाजी मगदूम, शिवाजी पाटील, ज्योतिराम पाटील, रमेश देसाई, बदाम साळुंखे, भूषण माळी, शशिकांत देसाई उपस्थित होते.
फोटो
: बामणी, ता. करवीर येथे शेतकऱ्यांची बैठक झाली.