लसीचे रोज ५० हजार डोस मिळण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:36+5:302021-06-25T04:17:36+5:30
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याला कोरोना प्रतिबंध लसीचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे पुरेशा प्रमाणात लसीकरण होत ...
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याला कोरोना प्रतिबंध लसीचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे पुरेशा प्रमाणात लसीकरण होत नाही. त्यामुळे रोज ५० हजारांपर्यंत लस राज्य शासनाने जिल्ह्याला पुरवावी, याबाबत आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली.
कोरोना लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई, वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, महानगरपालिकेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अमोल माने उपस्थित होते. यावेळी त्यांनी सध्या उपलब्ध असणारी लस दिव्यांग, परदेशी जाणारे विद्यार्थी, नोकरदार व तृतीयपंथीय यांना निश्चित दिवशी प्राधान्याने देण्यात यावी. तसेच आरोग्य सेवकांना दुसरा डोस देण्यासाठीही पाठपुरावा करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले, मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर भेटीदरम्यान कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात तपासण्यांची संख्या २० हजारांपर्यंत वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार तालुकानिहाय प्रयत्न सुरू असून रोज २८ ते ३० हजार तपासण्या होत आहेत ही समाधानाची बाब आहे. ज्या तालुक्यामध्ये ग्रामीण व नागरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्यांना लसीचा जास्त पुरवठा करून प्रथम ६० वर्षांवरील व त्यानंतर ४५ ते ६० वर्षे वयाच्या नागरीकांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करा असेही ते म्हणाले.
---
फोटो नं २४०६२०२१-कोल-कोरोना बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंध लसीकरणाबाबत बैठक झाली.
---