बांधकाम विभागासाठी अधिकाधिक निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:46 AM2021-02-28T04:46:54+5:302021-02-28T04:46:54+5:30
कोल्हापूर : कोरोना काळात संस्थात्मक अलगीकरण केंद्र बनविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा वाटा राहिला. वैद्यकीय रुग्णालय, नवीन प्रशासकीय इमारत ...
कोल्हापूर : कोरोना काळात संस्थात्मक अलगीकरण केंद्र बनविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा वाटा राहिला. वैद्यकीय रुग्णालय, नवीन प्रशासकीय इमारत अशा कामांसाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय अशा सुंदर इमारती निर्माण करून शहराच्या सौंदर्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गारही काढले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांधकाम भवन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना भेटून आम्ही निधीसाठी विनंती केली आहे. विभागाने प्रलंबित कामे पूर्ण करावीत. कोविड काळातही सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले काम केले त्याबद्दल मनापासून सर्वांचे कौतुक करतो.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याला शोभेल अशी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने उभी केली आहे. रखडलेली कामे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: खराब रस्ते, पडलेले खड्डे दुरुस्त करावेत. ग्रामीण भागातील रस्त्यांचे नियोजनबद्ध काम करा. जिल्ह्यासाठी निधी आणण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल.
अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अभियंता संजय सोनावणे यांनी इमारतीबाबत माहिती दिली. कोरोना योध्दे पांडुरंग पोवार, राहुल माळी, सारिका कुंभार, धनंजय भोसले, किरण हेगडे, संजय माने, अविनाश पोळ, दया लोहार यांचा सत्कार करण्यात आला.
---
फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण
यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत ५ फिरत्या पशवैद्यकीय दवाखान्यांचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते चावी देऊन लोकार्पण करण्यात आले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, सहायक आयुक्त डॉ. विनोद पवार उपस्थित होते.
--
फोटो नं २७०२२०२१-कोल-सार्वजनिक बांधकाम
ओळ : कोल्हापुरातील बांधकाम भवन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार राजेश पाटील, ऋतुराज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील उपस्थित होते.
--