घरकुले उभारणीस अनुदानावरील व्याज वापरणार

By admin | Published: October 3, 2016 12:59 AM2016-10-03T00:59:55+5:302016-10-03T00:59:55+5:30

इचलकरंजीत १0८ घरकुले : मुंबई येथील गृहनिर्माण मंत्रालयातील बैठकीत निर्णय

We will use the interest on subsidizing granaries | घरकुले उभारणीस अनुदानावरील व्याज वापरणार

घरकुले उभारणीस अनुदानावरील व्याज वापरणार

Next

इचलकरंजी : जयभीम झोपडपट्टीमधील उर्वरित १०८ घरकुले बांधण्यासाठी लागणारा निधी शासनाच्या अनुदान निधी व्याजातून एक कोटी, तसेच उर्वरित निधी शासनाचे अनुदान व नगरपालिका निधीतून करण्याचा निर्णय मुंबई येथे गृहनिर्माण मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या घरकुलांसाठी एकूण ३ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
शहरामधील जयभीम झोपडपट्टी व नेहरूनगर झोपडपट्टी या ठिकाणच्या १४८८ लाभार्थींकरिता अपार्टमेंट पद्धतीच्या इमारती बांधून घरकुले देण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य शासन यांचे अनुदान अनुक्रमे ७० टक्के व २० टक्के असे मिळणार होते व त्यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा दहा टक्के होता. त्याप्रमाणे नेहरूनगर येथे ४८ घरकुले बांधून तयार झाली आहेत. तर जयभीम झोपडपट्टीमध्ये ६१२ घरकुलांच्या इमारती बांधून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १०८ घरकुलांच्या इमारती बांधण्यास अद्याप सुरूवात झालेली नाही. बांधलेली घरकुले ताब्यात द्यावीत व उर्वरित १०८ घरकुलांच्या इमारती बांधण्यास सुरूवात करावी, या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यामध्ये झोपडपट्टीवासीयांनी उपोषण आंदोलन केले.
आंदोलन सुरू असतानाच घरकुलांच्या विषयावर ताबडतोब निर्णय घेण्यात यावा, या मागणीकरिता झोपडपट्टीवासीय नगरपालिकेत घुसण्याचे प्रकार दोनदा घडले होते. तसेच याची चर्चा नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये झाली होती. घरकुलांच्या या इमारती बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निधीची रक्कम बॅँकेमध्ये ठेवण्यात आली होती. या निधीवरील व्याजाची रक्कम सुमारे अडीच कोटी रुपये बॅँकेत पडून आहे. तर नवीन १०८ घरकुले बांधण्यासाठी ३ कोटी ७६ लाख रुपये आवश्यक आहेत. म्हणून गृहनिर्माण मंत्रालयाकडून मंजुरी आणून व्याज आणि शासनाच्या विशेष अनुदानातून घरकुले पूर्ण करावीत, अशी चर्चा नगरपालिकेच्या सभागृहात झाली होती.
त्याप्रमाणे गृहनिर्माण मंत्रालयात झालेल्या बैठकीसाठी उपसचिव ए. बी. धानुगडे, अव्वर सचिव पोवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, नगरसेवक सुनील पाटील व विठ्ठल चोपडे, बांधकाम विभागाकडील अभियंता राजेंद्र गवळी, आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे गृहनिर्माण मंत्रालयाकडून व्याजाच्या रकमेपैकी एक कोटी रुपये वापरण्यास मंजुरी देण्यात आली. उर्वरित राहिलेली रक्कम शासनाचा अनुदान हिस्सा व नगरपालिका निधीतून वापरण्याचे यावेळी ठरविण्यात आले. अशा प्रकारच्या निर्णयामुळे जयभीम झोपडपट्टीमधील १०८ लाभार्थींच्या घरकुलांचा विषय मार्गी लागला आहे, अशी माहिती नगरसेवक पाटील व चोपडे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: We will use the interest on subsidizing granaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.