डबल मास्क घाला, कोरोना टाळा (नियोजनातील विषय)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:10 AM2021-05-04T04:10:57+5:302021-05-04T04:10:57+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क हा सर्वाेत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यातही तुम्ही डबल मास्क घालून कोरोनापासून स्वत:ला दूर ...
कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क हा सर्वाेत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यातही तुम्ही डबल मास्क घालून कोरोनापासून स्वत:ला दूर ठेवू शकता असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यातही सर्जिकल मास्कऐवजी कापडी किंवा एन-९५ मास्कला प्राधान्य द्या, असा सल्ला डॉक्टर देतात.
गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी वारंवार हा धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. त्यातही मास्क हे कोरोनापासून वाचवण्याचे प्रभावी शस्त्र ठरले आहे. दोन व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आले तर त्यांनी एकमेकांपासून एक हाताच्या अंतरावर उभे राहून बोलणे आणि मास्क घालूनच बोलणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी डबल मास्क कोरोनाचा ९५ टक्क्यांपर्यंत अटकाव करू शकतो, अशा आशयाचे संशोधन केले आहे. तसेच नागरिकांनी एकावर एक असे डबल मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
सध्या नागरिकांकडून एकाच मास्कचा वापर केला जातो. तोदेखील बऱ्याचदा नाक आणि तोंडावर नसतो. अनेक मास्कच्या स्ट्रेचेबल पट्ट्या लूज असतात, नाकाजवळ फट राहते, काही मास्क केवळ लावण्यापुरत्या असतात. त्यांचा सुरक्षिततेसाठी फारसा उपयोग नसतो. अशा पद्धतीचे मास्क वापरणे टाळून बांधता येतील, नाक आणि तोंड पूर्णत: झाकले जाईल असे मास्क वापरणे गरजेचे आहे. एन-९५ चा एकच मास्क पुरेसा आहे. कापडी मास्क वापरत असाल तर चेहऱ्यावर फीट बसतील एकावर एक असे दोन मास्क वापरणे गरजेचे आहे.
---
हे करू नका...
-एकमेकांशी बोलताना नाक किंवा तोंडावाटे कोरोनाचे विषाणू आपल्यात जाऊ नयेत यासाठी मास्क वापरला जातो. प्रत्यक्षात मात्र अनेक जण बोलताना मास्क खाली घेतात जे अत्यंत चुकीचे आहे.
-अनेक जण मास्क नाक, तोंडावर लावण्याऐवजी हनुवटीवर ठेवतात, कानावर अडकवतात, ताेंडावरून काढून गळ्याभोवती घेतात.
-सर्जिकल किंवा कोणताही मास्क रस्त्यावर किंवा इतरत्र फेकू नका.
----
हे करा
-एन-९५ किंवा कापडी मास्कचा वापर करा. (कापडी मास्क दोन-तीन बांधले तरी चालतील.)
-मास्क राेज धुऊन वापरा.
-आपल्यासमोर कोणतीही व्यक्ती आली तर आधी मास्क घालून नाक व तोेंड सुरक्षित करा आणि मगच संवाद साधा.
-सर्जिकल मास्क एकदा वापरून त्याची विल्हेवाट लावा, हा मास्क पूनर्वापरायोग्य नसल्याने संसर्गाचा धोका अधिक.
-फेसशिल्ड आणि मास्क वापरला तरी पुरेसे आहे.
----
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण : ६९ हजार ९१४
बरे झालेले रुग्ण : ५७ हजार ९२६
उपचार घेत असलेले रुग्ण : ९ हजार ६१०
होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण : ग्रामीण : ४ हजार ८८२, शहरी : १ हजार १०८
---
तुम्ही बराच वेळ एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात असणार असाल, त्यांच्यासोबत काम करत असाल, बोलत असात, समोरची व्यक्ती आजारी असेल किंवा त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत असतील किंवा नागरिकांशी , थेट रुग्णांशी संपर्क येत असेल, अशा कोणत्याही परिस्थितीत डबल मास्क वापरणे गरजेचे आहे. सर्जिकलऐवजी कापडी किंवा एन-९५ मास्क वापरणे अधिक सुरक्षित आहे.
-डॉ. उत्तम मदने
--
डमी स्वतंत्र पाठवत आहे.