बुधवारही ठरला हीट डे :गुरुवारी थोडा दिलासा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 06:18 PM2021-03-31T18:18:39+5:302021-03-31T18:20:23+5:30
Temperature kolhapur- तापलेल्या सूर्याची अवकृपा बुधवारीही कायम राहिल्याने सलग दुसरा दिवस प्रचंड तापमानाचा ठरला. दुपारी तीन ते चार या वेळेत तापमानाने ४१ अंश सेल्सिअसवर उसळी घेतली. याचदरम्यान वारेही सुटल्याने उन्हाच्या झळांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
कोल्हापूर : तापलेल्या सूर्याची अवकृपा बुधवारीही कायम राहिल्याने सलग दुसरा दिवस प्रचंड तापमानाचा ठरला. दुपारी तीन ते चार या वेळेत तापमानाने ४१ अंश सेल्सिअसवर उसळी घेतली. याचदरम्यान वारेही सुटल्याने उन्हाच्या झळांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
गुरुवारी आणखी तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट होणार असल्याने आणखी दिलासा मिळणार आहे; पण त्यानंतर ४ ते ११ एप्रिल या कालावधीत मात्र कोल्हापूरकरांना आजवरच्या सर्वोच्च तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वेगाने वाढले आहे. मंगळवारी या हंगामातील सर्वोच्च ४० अंशांचे तापमान नोंदवले गेले. बुधवारीदेखील अशीच वाढ कायम राहत पारा ४० पार करून ४१ वर पोहोचला. साधारणपणे दुपारी पाऊणच्या सुमारालाच पारा ४० अंशांवर पोहोचला. पुढे चारपर्यंत हीच परिस्थिती होती. त्यानंतर तापमान हळूहळू कमी होत ३८ अंशांपर्यंत खाली आले. रात्रीचे तापमानही १७ अंशांपर्यंत खाली आल्याने उकाड्याचा त्रास काही अंशी कमी झाला.