महापालिकेत बुधवार ठरला आर्थिक उलाढालीचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:57+5:302021-04-01T04:25:57+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील बुधवारचा दिवस हा आर्थिक उलाढालीचा ठरला. ३१ मार्च वर्ष अखेर असल्यामुळे महापालिकेकडे येणारे पैसे जमा ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील बुधवारचा दिवस हा आर्थिक उलाढालीचा ठरला. ३१ मार्च वर्ष अखेर असल्यामुळे महापालिकेकडे येणारे पैसे जमा करून घेण्याबरोबरच दुसऱ्याची देणे देण्याचीही अक्षरश: धांदल उडाली होती. ही धादल रात्री बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. महापालिकेची एका दिवसातील चार कोटी ३० लाखांची जमा विक्रमी आहे.
सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील बुधवार हा अखेरचा दिवस होता. त्यामुळे सहाजिकच सकाळी नऊ वाजल्यापासून महापालिकेतील सर्व कार्यालये गजबजलेली पहायला मिळाली. सकाळी नऊ वाजता शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रांचे काम सुरू झाले. वर्षाचा अखेरचा दिवस असल्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत कामकाज सुरू राहिले.
दिवसभर कडाक्याच्या उन्हात नागरिकांनी या केंद्रावर पैसे भरण्यासाठी गर्दी केली होती. घरफाळा, पाणीपट्टी, इस्टेट विभाग, नगररचना, परवाना शुल्क भरण्याच्या निमित्ताने नागरी सुविधा केंद्रातील कामकाज बुधवारी अखंडपणे सुरू राहिले. परंतु अपुरी जागा आणि झालेली गर्दी यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचा मात्र पूर्ण फज्जा उडाल्याचे चित्र होते.
-साडेचार कोटींची जमा-
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत महापालिकेकडे घरफाळ्याच्या रुपाने दोन कोटी ९० लाख ३० हजार ८२९, पाणीपट्टीच्या रुपाने ४५ लाख, २२ हजार, ९२२, नगररचना व परवाना विभागाचे शुल्क म्हणून ९३ लाख ७७ हजार १५१ तर इस्टेट विभागाचे ८६ हजार ९९५ असे मिळून चार कोटी ३० लाख १७ हजार ८९७ रुपयांची कर जमा झाला. रात्री बारा वाजेपर्यंत भरणा करून घेण्यात येणार असल्याची हा आकडा आणखी वाढणार आहे.
-साडेतीन कोटींची बिले भागविली -
महापालिकाने शासकीय तसेच स्वनिधीतून केलेल्या विकास कामांची सुमारे अडीच कोटी रुपयांची बिले भागविली. जी कामे पूर्ण झाली होती, पण बिले अदा झाली नव्हती अशा बिलांचा त्यात समावेश आहे. याशिवाय जलसंपदा विभागाची पाणीपट्टी एक कोटी रुपये भागविले. याआधी तीन दिवसापूर्वीच एक कोटी रुपये त्यांचे दिले होते. वीज बिलापोटी पालिकेने महावितरणचे तीन कोटी ५० लाखांचे बिल भागविले आहेत.