शहरात वीकेंड लॉकडाऊनचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:37+5:302021-07-12T04:16:37+5:30
कोल्हापूर : शहर आणि परिसरात रविवारी खरेदीसाठी ग्राहक मोठया संख्येने बाहेर पडल्याने वीकेंड लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसत होते. ग्राहक, ...
कोल्हापूर : शहर आणि परिसरात रविवारी खरेदीसाठी ग्राहक मोठया संख्येने बाहेर पडल्याने वीकेंड लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसत होते. ग्राहक, दुकानदार, विक्रेते, व्यापाऱ्यांनीच निर्बंध झुगारल्याचे चित्र होते. यामुळे पोलीस प्रशासन हतबल बनले होते. चौका-चौकात ते वाहनांची तपासणी करीत होते, पण गर्दीचा उचांक झाल्याने पोलीस यंत्रणाही कुचकामी ठरली.
कोरोना नियंत्रणात न आल्याने सरकारने अजूनही निर्बंध हटवलेले नाहीत. शनिवार, रविवारी वीकेंड लॉकडाऊन कायम आहे. पण शनिवारीही याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. रविवारी दिवसभर शहरात सर्वत्र वर्दळ राहिली. यावरून वीकेंड लॉकडाऊन पाळण्याची मानसिकता ग्राहक, व्यापाऱ्यांतही नसल्याचे दिसून आले. यातूनच लक्ष्मीपुरी, महाद्वार रोडला जत्रेचे स्वरूप आले होते. राजारामपुरीत काही परिसरातही असेच चित्र राहिले. सरसकट दुकाने उघडण्यास बंदी आहे. पण दुकानदार, व्यापाऱ्यांचीही सहनशीलता संपल्याने, अर्धे शटर उघडून ते ग्राहकांना वस्तू देत होते. ग्राहकही रेडिमेेड कपडे, चप्पल आणि इतर वस्तू अशाप्रकारे खरेदी करीत होते. शासकीय सुटी असल्याने पर्यटनालाही अनेकजण बाहेर पडले. यामुळे शहरात परजिल्हा, राज्यातील वाहने दिसत होती. अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी, बाहेरून नमस्कार करण्यासाठी भक्तांची मांदियाळी राहिली. परिणामी भवानी मंडपात भक्तांचा वावर राहिला. रंळाका तलाव, पंचगंगा घाट, शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, जोतिबा तीर्थक्षेत्र, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर येथेही पर्यटकांची वर्दळ वाढली होती.
चौकट
सामाजिक अंतराचे नियम पायदळी
लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड परिसरात दुपारपर्यंत खरेदीसाठी झुंबड उडाल्याने कोरोना प्रतिबंधासाठीचा सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडवले जात होते. जत्रेचे स्वरूप आल्यामुळे या नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणेे महापालिका यंत्रणेस अशक्य बनले. पावसाने उसंत दिल्यामुळे अनेकजण खरेदीसाठी सहकुटुंब बाहेर पडल्याचे दिसत होते.
चौकट
रस्यावर वाहने
शहरातील प्रमुख रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या संख्येने आली होती. यामुळे लक्ष्मीपुरी, शिवाजी रोड, महाद्वार रोड, सुभाष रोड, राजारामपुरी परिसरात वाहतुकीची कोंडी होत राहिली. वीकेंड लॉकडाऊनला वाहनांची गर्दी नसल्याने शनिवारी, रविवारी शहरातील सिग्नल बंद असत. पण या रविवारी वाहने अधिक असल्याने प्रमुख चौकातील सिग्नल सुरू होते.
पन्हाळ्यावरही...
कोरोना रुग्णसंख्या कमी न झाल्याने अजूनही पर्यटनस्थळे, मंदिरे दर्शनासाठी खुली नाहीत. तरीही विविध कारण पुढे करून वशिलेबाजीने पर्यटनस्थळी येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळ्यावर सदस्य जात आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्ते, समर्थकही जात आहेत. पर्यटकही गटा-गटाने येत आहेत. यामुळे पन्हाळगडही गर्दीने फुलून गेला होता. राजकीय मंडळींचाच वावर वाढल्याने सामान्य पर्यटकांना अडवताना पोलीस प्रशासनावरही मर्यादा येत आहेत.
फोटो - ११०७२०२१- कोल- लक्ष्मीपुरी गर्दी
कोल्हापुरात वीकेंड लॉकडाऊन असतानाही लक्ष्मीपुरी भाजी मंडईत रविवारी अशी गर्दी झाली होती.
फोटो : नसीर अत्तार
फोटो - ११०७२०२१- कोल- महाव्दार रोड गर्दी
कोल्हापुरातील महाद्वार रोडवर वीकेंड लॉकडाऊन असतानाही रविवारी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
फोटो : नसीर अत्तार