कुरुंदवाडमधील आठवडी बाजार हटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:22+5:302021-04-09T04:27:22+5:30
कुरुंदवाड : कोरोनामुळे जमावबंदी आदेश असताना शिवाय पालिका प्रशासनाने गुरुवारचा आठवडी बाजार न भरविण्याचा निर्णय घेतला असतानाही बाजारासाठी व्यापारी, ...
कुरुंदवाड : कोरोनामुळे जमावबंदी आदेश असताना शिवाय पालिका प्रशासनाने गुरुवारचा आठवडी बाजार न भरविण्याचा निर्णय घेतला असतानाही बाजारासाठी व्यापारी, शेतकरी, नागरिकांनी गर्दी केल्याने पालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांनी दुकाने सुरू केलेल्या, तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला. यावेळी काही ठिकाणी व्यावसायिकांबरोबर वादावादीचे प्रकार घडल्याने तणावही निर्माण झाला होता.
शहरात दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचे दोन रुग्ण आढळून आल्याने पालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शासन निर्णयानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्यासाठी शहरवासीयांना आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील गुरुवार हा आठवडी बाजार असल्याने गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी मुख्याधिकारी जाधव यांनी आठवडी बाजार रद्द केला आहे. मात्र, बंदचा आदेश झुगारणाऱ्यांवर पोलीस व पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. त्यामुळे या कारवाईची व्यावसायिकांनी चांगलीच धास्ती घेतली.
फोटो - ०८०४२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील आठवडी बाजार मुख्याधिकारी निखिल जाधव आणि पोलीस पथकाने हटविला.