कापड गाठींचे वजन ५० किलो करा, अन्यथा कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:35+5:302021-09-05T04:28:35+5:30
इचलकरंजी : येथील व्यापारीवर्ग आणि ट्रान्सपोर्ट मालक हे स्वतःच्या फायद्यासाठी टेम्पो हमालांना ९० ते १०० किलो वजनाच्या गाठी उचलण्यास ...
इचलकरंजी : येथील व्यापारीवर्ग आणि ट्रान्सपोर्ट मालक हे स्वतःच्या फायद्यासाठी टेम्पो हमालांना ९० ते १०० किलो वजनाच्या गाठी उचलण्यास भाग पाडतात. याला कामगारांचा विरोध आहे. कापड गाठींचे वजन शासन नियमानुसार ५० किलोपर्यंत मर्यादित ठेवावे, अन्यथा एक महिन्यानंतर कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहरातील टेम्पो असोसिएशन व माथाडी कामगार संघटनांनी दिला.
कापड गाठीचे वजन शासन नियमानुसार ५० किलो असणे बंधनकारक असताना येथील व्यापारी व ट्रान्सपोर्टमालक यांच्याकडून हमालांना ९० ते १०० किलो वजनाच्या गाठी उचलण्यास भाग पाडतात. जास्त वजनाच्या गाठी उचलण्यास हमालांनी नकार दिल्यास ट्रान्सपोर्टची बिल्टी रद्द करून दुसऱ्या ट्रान्सपोर्टला गाठी देतो, अशी दमदाटी व अरेरावीचा भाषा वापरली जाते. गाठी उचल नाहीतर तुझ्या टेम्पोच्या जागी दुसरा टेम्पो लावतो अशी धमकी दिली जाते. उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने टेम्पो हमाल नाइलाजाने वजनदार गाठी उचलतो. त्यामुळे कापड गाठी उचलणाऱ्या टेम्पो हमालांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. ही बाब आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन १२७ चे उल्लंघन करणारी असून, गंभीर आहे. या संदर्भात माजी आमदार राजीव आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या महिन्याभरात बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इचलकरंजी टेम्पो असोसिएशनचे अध्यक्ष अब्राहम भोसले व माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लाखे यांनी दिला. यावेळी अर्जुन देसाई, अनिकेत तानुगडे, गोपीनाथ चौगुले, इसाक आवळे, सचिन जाधव यांच्यासह अन्य माथाडी कामगार व टेम्पोमालक उपस्थित होते.