थकीत ऊसबिले ५ जूनला देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 01:09 AM2017-05-16T01:09:53+5:302017-05-16T01:09:53+5:30

‘न्यूट्रीयन्टस’ बाबतच्या बैठकीत निर्णय : कामगारांचे पगार जूनपासून तीन टप्प्यांत

Weighed up on fatigues on June 5 | थकीत ऊसबिले ५ जूनला देणार

थकीत ऊसबिले ५ जूनला देणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील ‘न्यूट्रीयन्टस’ (दौलत) कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलापोटी ५ जूनला २० कोटी रुपये बॅँकेत जमा केल्यानंतर शिल्लक साखर विक्री करण्यास परवानगी द्यायची. त्याच बरोबर कामगारांचा थकीत पगारही जूनपासून तीन टप्प्यांत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे शेतकरी, कामगार व कंपनी दरम्यानच्या वादावर अखेर पडदा पडला.
शेतकरी, कामगार व ऊस वाहतूकदारांचे पैसे न दिल्याने कारखान्यातील साखर विक्री रोखली होती. हा वाद विकोपाला गेल्याने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी हस्तक्षेप करीत सोमवारी संबंधित घटकांची बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. ‘न्यूट्रीयन्टस’चे प्रमुख व जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी ‘दौलत’ भाडेतत्त्वावर कसा घेतला, याची माहिती दिली. आतापर्यंत ८१ कोटींची गुंतवणूक केली असताना २२ कोटींसाठी पळून जाणार का? याबाबत शेतकरी, कामगार यांच्याशी अनेक वेळा चर्चा करूनही कामगार उद्धट बोलत असल्याचे अप्पी पाटील यांनी सांगितले.
यावर हरकत घेत २०१०-११ मध्ये तासगांवकर शुगर्सच्या बाबतीत असाच पेच निर्माण झाल्याने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हाच तोडगा काढला; पण त्यांनी पैसे दिलेच नाहीत. हा अनुभव पाठीशी असल्याने आमचे पैसे मिळाल्याशिवाय साखर विक्री करू देणार नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्राम कुपेकर यांनी सांगितले. २७६५ रुपये दर जाहीर केला म्हणूनच शेतकऱ्यांनी तुमच्याकडे ऊस घातला. आता ‘एफआरपी’ची भाषा करू नका, असे ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांनी सांगितले.
प्रलंबित पैसे कसे उपलब्ध करून देणार याबाबत विश्वास कसा देणार, असा सवाल आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केला. टप्प्याटप्प्याने साखर विक्री करून त्यातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा पर्याय पोलीस अधीक्षक मोहिते यांनी काढला; पण तसे शक्य नसल्याचे सांगत ५ जूनपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांच्या बिलापोटी वीस कोटी द्यायचे त्यानंतर साखर विक्रीस परवानगी द्यायची. जूनच्या पगारापासून प्रत्येक महिन्याला प्रलंबित एक पगार असे कामगारांची देणी द्यायची. त्यानंतर ऊस वाहतूकदारांचे पैसे द्यावे, असा तोडगा जिल्हाधिकारी सुभेदार यांनी काढला. त्यास सगळ्यांनी मान्यता दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रातांधिकारी संगीता चौगले, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक महावीर सकळे, गोपाळराव पाटील, सुनील शिंत्रे, प्रतापसिंह चव्हाण, जे. जी. पाटील, अर्जुन कुंभार, प्रदीप पवार, आदी उपस्थित होते.


चव्हाणसाहेब तुमचा फास काढला आमचे काय?
‘दौलत’च्या थकीत कर्जामुळे जिल्हा बॅँकेचा परवाना धोक्यात आला होता, असे प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले. ‘दौलत’च्या शेतकऱ्यांनी मदत केल्याने तुमच्या गळ्याभोवतीचा फास निघाला. आता आमच्या गळ्याला फास लागलाय, आता आम्हाला मदत करा, अशी मागणी विष्णू गावडे यांनी केली.

गरजेएवढेच कामगार घेणार
साखर कारखान्यांच्या धोरणानुसार ३५०० टन गाळप क्षमतेनुसार जेवढे कामगार गरजेचे आहेत, तेवढेच कामावर घेणार असल्याचे अप्पी पाटील यांनी सांगितले.
यावर कामगार प्रतिनिधींनी हरकत घेतली; पण सहकारी कारखान्यासारखे बोलू नका, खासगी कंपनी आहे याचे भान ठेवा, अशा शब्दांत पोलीस अधीक्षकांनी कामगार प्रतिनिधींना समजावले.

जिल्हा बॅँकेचा ड्रॉव्हर केन पेमेंटसाठी नव्हे
जिल्हा बॅँकेशी झालेल्या करारानुसार ‘न्यूट्रीयन्टस’ने १७ कोटींचा दुसरा हप्ता दिलेला नव्हता. बॅँकेने केन पेमेंटसाठी ड्रॉव्हर दाखवून ते पैसे मात्र करारातील पैसे वसूल करण्यासाठी वापरल्याचे तानाजी गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले.

Web Title: Weighed up on fatigues on June 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.