बॉक्सच्या वजनावरून खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:50 AM2017-10-15T00:50:17+5:302017-10-15T00:57:59+5:30
कोल्हापूर : एक किलोच्या गुळाच्या बॉक्सच्या वजनावरून शेतकरी, व्यापाºयांच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.
कोल्हापूर : एक किलोच्या गुळाच्या बॉक्सच्या वजनावरून शेतकरी, व्यापाºयांच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. बॉक्सचे पैसे व्यापाºयांनी द्यावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली; तर बॉक्सविरहित गूळ आणावा, आम्ही खरेदी करतो, यावर व्यापारी ठाम राहिल्याने दोन तासांत ठोस तोडगा निघालाच नाही. अखेर बॉक्ससह हमालीच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय झाला.
हंगामात कोणत्याही कारणाने सौदे बंद पडू नयेत, याची दक्षता सर्वच घटकांनी घ्यायची आणि ज्यांच्यामुळे सौदे बंद पडतील त्या संबंधितांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.गूळ हंगामाबाबत बाजार समितीत शनिवारी शेतकरी, व्यापारी, अडत्यांची बैठक आयोजित केली होती. एक किलो गुळाच्या रव्याच्या पॅकिंगचे वजन धरावे अन्यथा त्याचे पैसे व्यापाºयांनी द्यावेत. दिवसाला एका शेतकºयाचे ६०० ते ९०० रुपयांचे नुकसान होत असल्याचे दादासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. सांगली वगळता उर्वरित बाजारपेठेत पॅकिंगचे वजन धरले जात नाही.
बॉक्सच्या वजनातही तूट असल्याचे टिक्कू पटेल, विक्रम खाडे, पिंटू खोए यांनी सांगितले. यावर हरकत घेत आमच्या गुळाची गुणवत्ता चांगली असूनही सांगली पेठेत ५ ते २५ रुपये जादा दर मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. बॉक्सच्या पैशासाठी भांडता; पण तुमच्या गुळात कचरा व मुंगळे असल्याने अन्न औषध प्रशासन आमच्यावर कारवाई करीत असल्याचा आरोप टिक्कू पटेल यांनी केला. गूळ तयार करण्यापासून सर्व प्रक्रियेत आम्ही स्वच्छता पाळतो. तुमच्या गोडावूनमधील अस्वच्छतेमुळेच मुंगळे लागत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तुम्ही विषयांतर करून दिशाभूल करणार असाल तर गुºहाळघरे चालूच करीत नसल्याचा इशारा उत्तम पाटील यांनी दिला.
कोणत्याही पॅकिंगवर निव्वळ वजन लिहावे, असा कायदा असल्याचे निकेत दोशी व सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. कायदा सांगून शेतकºयांना भीती दाखवू नका, तोडगा काढायचा झाल्यास बॉक्सचे पैसे एकाच घटकावर लादून चालणार नसल्याचे संचालक विलास साठे यांनी ठणकावून सांगितले. याबाबत पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.
जादा बॉक्सची हमाली मिळावी, अशी मागणी बाबूराव खोत यांनी केली. दरवर्षी १० टक्के वाढ मिळत असताना नव्याने मुद्दा का काढता, असे विक्रम खाडे, अमीश पटेल यांनी सांगितले. सौद्याची वेळ वाढवावी, असे श्रीकांत घाटगे यांनी सांगितले. बॉक्सचे वजन व हमालीबाबत मंगळवारी (दि. १७) बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय झाला. यावेळी बाळासाहेब मनाडे, शिवाजी पाटील, भगवान काटे यांनी चर्चेत भाग घेतला. सभापती सर्जेराव पाटील, उपसभापती आशालता पाटील, सचिव दिलीप राऊत व संचालक उपस्थित होते.
लेव्ही वसुली पुरतेच तुम्ही का?
सौदे बंद पाडून शेतकºयांचे नुकसान करू नका, असा जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्याचे माथाडी बोर्डाचे निरीक्षक के. डी. खैरे यांनी सांगितले. यावर हरकत घेत हमालांनी संप केला तर माथाडी बोर्डाने पर्यायी व्यवस्था द्यायला पाहिजे. तुम्ही फक्त लेव्ही वसुलीपुरते येणार का? अशी विचारणा उपसचिव मोहन सालपे यांनी केली.