जिल्ह्यात ‘बाप्पा’चे जल्लोषी स्वागत

By admin | Published: September 17, 2015 11:31 PM2015-09-17T23:31:09+5:302015-09-17T23:43:50+5:30

‘मोरया...मोरया...’चा गजर : पारंपरिक वाद्यांचा ठेका

Welcome to 'Bappa' | जिल्ह्यात ‘बाप्पा’चे जल्लोषी स्वागत

जिल्ह्यात ‘बाप्पा’चे जल्लोषी स्वागत

Next

गडहिंग्लज विभाग
गडहिंग्लज : ‘गणपती बाप्पा मोरया..गणपतीचा जय..जयकार’च्या घोषणा, ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांजी आतषबाजी अन् बेंजोंच्या निनादात गडहिंग्लज शहरासह तालुक्यात घरगुत्ती व सार्वजनिक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ‘श्रीं’चे जल्लोषी स्वागत करून प्रतिष्ठापना केली.
शहरातील कुंभार वाड्यामध्ये लाडक्या गणरायाला नेण्यासाठी सकाळी पाच वाजल्यापासून गावा-गावांतील नागरिकांनी व शहरवासीयांनी गर्दी केली होती. कांही नागरिकांनी एकत्र येत ‘श्रीं’च्या मूर्ती नेल्या. दुपारी १२ नंतर शहर व परिसरातील तरुण मंडळांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॅक, आदी चारचाकी वाहनांतून मिरवणुकीने ‘श्रीं’च्या मूर्ती पूजनासाठी नेल्या. सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणुकीने ‘बाप्पा’चे आगमन सुरू होते.
आजऱ्यात स्वागत
आजरा : आजरा व उत्तूर शहरासह तालुक्यात प्रचंड जल्लोषात ‘बाप्पा’चे स्वागत झाले. सकाळपासूनच ठिकठिकाणच्या गणेशमूर्ती नेण्यासाठी कुंभारवाड्यांत गणेशभक्तांनी गर्दी केली होती. दुपारनंतर मिरवणुकीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मूर्तींची प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर आजरा शहरात केंद्रीय राखीव पोलीस दल, पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इचलकरंजी परिसर
इचलकरंजी : डॉल्बीला फाटा देत ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’च्या जयघोषात फटाक्यांची आतषबाजी करीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात इचलकरंजीत गुरुवारी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळपासून घरगुती गणपती प्रतिष्ठापना, तर दुपारनंतर मंडळांचे गणपती वाजत-गाजत आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे दिवसभर भक्तिमय वातावरण पसरले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी मंडळांमध्ये, तसेच घरांमध्ये सुरू होती. आकर्षक आरास यासाठी अनेक संस्थांनी बक्षीस व स्पर्धा ठेवली असल्याने नावीन्यपूर्ण आरास बनविण्यात अनेक भक्त मग्न होते. गुरुवारी सकाळपासून कुंभारवाडा, गांधी पुतळा ते जनता चौक, शाहू पुतळा, सोन्या मारुती मंदिरासमोर, डेक्कन चौक, कलानगर, मंगलधाम, शहापूर, सांगली नाका, थोरात चौक या परिसरात गणपती आणण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यापाठोपाठ दुपारनंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही पारंपरिक वाद्यांसह या परिसरात मंडळांचे गणपती आणण्यासाठी गर्दी केली. यावेळी विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना घरोघरी व मंडळांमध्ये करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या.
दरम्यान, हार-तुरे, फुले यांसह सजावट साहित्याच्या दरामध्ये दुप्पटीने वाढ होऊनही खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली होती. तुलनेत फटाक्यांच्या मागणीत यंदा लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. संपाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव कमी प्रमाणात साजरा होईल, असा अंदाज असला तरी तो फोल करीत भक्तांनी उत्साहात गणरायाचे स्वागत केले.
जयसिंगपूर, शिरोळ परिसर
जयसिंगपूर : ‘गणपती बाप्पा मोरया. ...’च्या गजरात आणि ढोल, ताशे, हलगीच्या निनादात गुरुवारी घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे जयसिंगपूर, शिरोळसह परिसरात उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळच्या सत्रात घरगुती गणेशमूर्तींचे स्वागत करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
जयसिंगपूर, शिरोळसह प्रत्येक गावांत, बाजारपेठेत गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती. दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणरायाचे उत्साहात स्वागत केले. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने झांजपथक, ढोल, ताशे, हलगीच्या निनादात आणि गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जयसिंगपूर येथील काही देखावे आजपासून खुले केले असून, बुधवारपासून सर्वच देखावे खुले होणार आहेत. गणरायाच्या स्वागतामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जयसिंगपूर पोलीस ठाण्याअंतर्गत १५0 सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद झाली आहे. जयसिंगपूरमध्ये काही मार्ग एकेरी करण्यात आले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेतील विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली होती.
पेठवडगाव परिसर
पेठवडगाव : शहरातील कुंभार गल्ली येथे गणरायाचे आगमन उत्साही वातावरणात झाले. हलगी, ताशा, ढोल वाद्यांच्या पारंपरिक गजर आणि गणेशाच्या जयघोषात आगमन मिरवणुका काढण्यात येत होत्या. सकाळी घरगुती, तर सार्वजनिक मंडळांची दुपारपासून रात्रीपर्यंत प्रतिष्ठापना सुरूहोती.
गुरुवारी पहाटेपासून कुंभार गल्लीत नागरिकांनी व कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. काहींनी गणपती बुकिंग केले होते, तर काहींनी विविध ठिकाणी पाहणी करून गणेश मूर्ती घेत होते. पावसाने उसंत दिल्यामुळे जल्लोषी वातावरणात मिरवणूक, विविध वाद्य, गुलाल विविध रंग, आदींची उधळण सुरूहोती. विशेष म्हणजे आज तरी विविध मंडळांनी पोलिसांच्या डॉल्बी मुक्तीला फाटा दिल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमी पूजनासाठी फुले, पाने यांची मागणी होत होती. तसेच खरेदीसाठी बाजारपेठ फुलून गेली होती. विद्युत रोषणाईच्या झगमगाटात स्टॉलवर फॅन्सी माळा, आदींची मागणी होत होती.
गणेशाच्या आगमन मिरवणूक पार्श्वभूमीवर कुंभार गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पालिका चौक, आदी ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, गोंधळ झाला नाही.
आंबा परिसर
आंबा : ‘मोरया...मोरया...’च्या गजरात गुरुवारी घरगुती गणेशाचे उत्साहात स्वागत झाले. या उत्सवासाठी मुंबईचे चाकरमानी मोठ्या प्रामाणात गावाकडे परतले आहेत. सकाळी ढगाळ हवामान राहिल्याने पावसाच्या भीतीने गणेशमूर्ती घरी नेण्याची धांदल उडाली. काहींनी ट्रक, जीप, रिक्षातून, तर काहींनी दुचाकीवरून गणेशाचे घरात स्वागत केले.
आंब्यासह गजापूर, लव्हाळा, वारूळ, केर्ले, चांदोली, मानोली येथील सार्वजनिक गणपतींचे दुपारनंतर मिरवणुकीने स्वागत झाले. दुपारी तीननंतर पावसाने या भागात हजेरी लावली. पावसातही तरुणाईचा मोठा उत्साह राहिला. मलकापूर, बांबवडे येथील बाजारपेठेवर मात्र दुष्काळ आणि मंदीचे सावट जाणवले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईहून गावी येण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे दुपटीने वाढले आहे. एरवी २५० ते ३०० रुपये असलेले भाडे उत्सवकाळात ७०० ते ८०० रुपये असे वाढल्याने चाकरमान्यांतून नाराजी व्यक्त झाली.
कागल परिसर
कागल : कागल शहर आणि परिसरात विघ्नहर्त्या गणरायाचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचेही वाजत-गाजत आगमन झाले.
येथील शाहू हॉलमध्ये चार दिवसांपूर्वीच श्रींच्या मूर्ती विक्री करण्यासाठी बाहेर गावांहून मूर्र्तिकार आले होते. त्यामध्ये कोल्हापूर, गडहिंग्लज, एकोंडी, सेनापती कापशी, लिंगनूर दुमाला, आदी गावांतील कुंभारांचा समावेश होता. येथील कुंभारवाडा, कोष्टी गल्ली, हणबर गल्ली, शाहू कॉलनी, जयसिंगराव पार्क या ठिकाणीही गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, खरेदीसाठी शाहू हॉलजवळ जास्त गर्दी झाली होती. यामुळे गैबी चौक ते शाहू हॉल, मुजावर गल्ली, या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. गणेश उत्सवाच्या अनुषंगाने लागणारे विविध साहित्य, वस्तू यांची विक्री करणारी दुकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागली होती, तर पारंपरिक वाद्ये, हलगी, घुमके, ढोल-ताशे, बॅण्डबाजा, बँजो यांची पथके येथे हजर होती. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि फटाक्यांच्या कडकडाटात वाजत गाजत श्रींना घरी आणण्यात आले. शहरातील सार्वजनिक मंडळांनी भव्य अशा मूर्ती मिरवणुकीने आणल्या. शहराच्या मुख्य मार्गावर या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही गर्दी झाली होती.
कोडोली परिसर
कोडोली : कोडोली परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून कुंभारवाडा येथे घरगुती गणेश मूर्ती आणण्यासाठी आबालवृद्धांसह बालगोपालांनी चांगलीच गर्दी केली होती. गणपती बापा मोरया, गणेश गणेश मोरयाच्या गजरात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळी अकरा वाजेपर्यंत बहुतांश घरगुती गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, तर दुपारी बारानंतर कुंभारवाडा येथे विविध गणेश मंडळांच्या मूर्ती नेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशे लेझीम यासारख्या पारंपरिकवाद्यांच्या गजरात टॅक्टर-टॉली, छोटा हत्ती, टेम्पो, टॅक्स, आदी वाहने सजवून कोडोलीसह परिसरातील बहिरेवाडी, जाखले, केखले, पोखले, मोहरे, माले, काखे, सातवे, बोरपाडळे, शहापूर, मिठारवाडी येथील विविध मंडळांनी श्रींची मूर्ती वाजत-गाजत नेली. कुंभारवाडा येथे विविध मंडळांसाठी मोठ्या आकाराच्या सुमारे १५० हून अधिक श्रींच्या मूर्ती बनविल्या होत्या. श्रींच्या आगमनामुळे बाजारपेठेत सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती.
मलकापूर परिसर
मलकापूर : मलकापूर परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. सकाळी सात वाजल्यापासून दुपारपर्यंत गणेशभक्तांनी कुंभारवाड्यात गर्दी केली होती. घरगुती गणेशमूर्तीही वाहनांतून नेण्यात येत होत्या. मलकापूर बाजारपेठेत गणपतीच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती.
दुपारी मलकापूर, शाहूवाडी, आंबा, आदी बाजारपेठेत सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्ती नेल्या. मलकापूर येथील कुंभारवाड्यात दिवसभर गर्दी केली होती. शाहूवाडी पोलिसांनी मलकापुरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
गारगोटी परिसर
गारगोटी : ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या गजरात अभूतपूर्व उत्साहात भक्तिपूर्ण वातावरणात गुरुवारी सकाळी घरगुती गणपतींचे आगमन झाले. सकाळपासून कुंभार आणि मूर्तिकारांच्या दारात भाविकांनी गर्दी केली होती.
तरुण मंडळांच्या गणपती मूर्ती दुपारी बारानंतर वाजत-गाजत वाहनांवरून जात होत्या. काही मंडळांनी झांजपथक, काहींनी भजन म्हणत, तर काही मंडळांनी हलगीसारख्या पारंपरिक वाद्याच्या गजरात गणपती आणले.
सर्वत्र शांततेत व भक्तिपूर्ण वातावरणात गुरुवारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ट्रॉली, जीप अशा वाहनांनी मोठ्या गणेशमूर्ती नेण्यात आल्या. गुरुवारी दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
हातकणंगले परिसर
हातकणंगले : तालुक्यामध्ये गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले. तरुण मंडळांचे कार्यकर्ते सकाळपासूनच गणरायाच्या सजावटीसह बेंजो, ताशांच्या निनादामध्ये ताल धरून आपआपल्या मंडळाचे गणपती मंडपामध्ये विराजमान करण्यामध्ये गुंग झाले होते. सार्वजनिक गणपतीबरोबर घरगुती गणपतीसाठीही आबालवृद्धांची लगबग सुरू होती. तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती पाहता गणपती मंडळांमध्ये थोडासा अनुत्साह जाणवत आहे.
कसबा बावडा परिसर
कसबा बावडा : अमाप उत्साह, वाद्यांचा निनाद आणि ‘मोरया...’चा अखंड गजर अशा चैतन्यदायी आणि मंगलमय वातावरणात गुरुवारी कसबा बावड्यातील ‘श्रीं’चे आगमन झाले. सायंकाळी सहानंतर मात्र ढोल, ताशा, झांजपथक आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगात सार्वजनिक मंडळांच्या ‘श्रीं’चे भव्य मिरवणुकीने आगमन झाले. काही मंडळांचा अपवाद वगळता बहुतेक मंडळांनी डॉल्बीला फाटा देणेच पसंत केले होते. रात्री उशिरापर्यंत ‘श्रीं’च्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत होती.
गणरायाच्या स्वागतासाठी आतुरलेल्या गणेश भक्तांनी गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासूनच बावड्याच्या मुख्य रस्त्यावर गर्दी केली. दहानंतर तर अक्षरश: रीघ लागली होती. ही गर्दी वाढतच गेली. गणेशमूर्ती नेण्यासाठी लोक सहकुटुंब येत होते. मुख्य रस्त्यावरच दुर्वा, अगरबत्ती, कापूर, फळे, फुले व मूर्तीच्या सजावटीच्या साहित्याचे स्टॉल मांडण्यात आले होते.
पन्हाळा परिसर
पन्हाळा : गणेशोत्सवानिमित्त सकाळपासून पन्हाळ््याच्या पायथ्याशी नेबापूर येथील कुंभारवाड्यात आणि पन्हाळा शहरात मूर्तिकार बांदिवडेकर यांच्या घरातून गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती. शहरात पाच मंडळे आहेत. त्यांनी वाजत-गाजत दुपारनंतर गणेशमूर्ती आणून प्रतिष्ठापना केली.

Web Title: Welcome to 'Bappa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.