‘लेकी’च्या जन्माचे वाजतगाजत स्वागत
By Admin | Published: January 29, 2016 12:42 AM2016-01-29T00:42:11+5:302016-01-29T00:44:54+5:30
शिवाजी पेठेतील साळोखे कुटुंबीय : मुलगा पाहिजे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन
कोल्हापूर : मुलगी झाली म्हणून नाके मुरडणाऱ्यांची संख्या आजच्या घडीला कमी नाही. अशा काळात मुलगी झाली म्हणून तिचे स्वागत गुरुवारी शिवाजी पेठेतील साळोखे कुटुंबीयांनी अगदी बँडबाजा आणि आकर्षक चांदीच्या रथातून मिरवणूक काढून केले.
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळ येथे राहणारे अॅड. योगेश साळोखे यांच्या पत्नी तेजस्विनी यांच्या पोटी जन्मलेल्या ‘जिजा’ या मुलीचे स्वागत अगदी वेगळ्या प्रकारे केले. ‘जिजा’चा जन्म झाल्याने साळोखे कुटुंबीयांनी गेले तीन दिवस झाले घराला विद्युत रोषणाई केली आहे. यासह परिसरातील घरांमध्ये पेढे वाटून आनंद साजरा केला. विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी हे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी यांनी मरगाई गल्ली येथील राजे संभाजी तरुण मंडळापासून ‘जिजा’ व तिची आई तेजस्विनी आणि मित्रमंडळींतील मुलींना कोल्हापुरी फेटे बांधून आकर्षक चांदीच्या रथातून व बँडबाजा वाजवीत मिरवणूक काढली. यावेळी बँडवर वाजविण्यात येणारी धूनही अगदी ‘लेक लाडकी’ अशा पद्धतीची होती. ही आगळीवेगळी मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व आबालवृद्ध उपस्थित होते. तेजस्विनी यांचे माहेर मरगाई येथील असल्याने योगेश यांनी पत्नीच्या घरापासून आपल्या घरापर्यंत ‘जिजा’ची मिरवणूक काढली.
घरातील वातावरण अगदी मध्यमवर्गीय आहे. कुटुंबीयांचा म्हशीपालन हा मुख्य व्यवसाय आहे. कुटुंबात आमची पिढी उच्चशिक्षित आहे. त्यात आमच्या घरात मुलगी नसल्याने आमच्या सर्व कुटुंबीयांना मुलगीच हवी होती. माझी मुलगी ‘जिजा’ची मिरवणूक काढण्यासाठी मला कुटुंबीयांनीच प्रोत्साहित केले. माझ्या पत्नीसह तिच्या माहेरकडील नातेवाईक मंडळींनीही या उपक्रमाला पाठिंबा देत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. - अॅड. योगेश साळोखे