भेटवस्तू, आहेराला फाटा देत रोपे देऊन स्वागत
By Admin | Published: February 10, 2015 11:17 PM2015-02-10T23:17:17+5:302015-02-10T23:54:00+5:30
घराशेजारीच तयार केली नर्सरी : मुलीच्या विवाहात पाटील कुटुंबीयांचा उपक्रम
आजरा : लग्नमंडपात आलेल्या पाहुण्यांना आहेरवस्तू कपड्यांच्या स्वरूपात न देता आंबा, नारळ, चिकू, आदींची रोपे देऊन आपले निसर्गप्रेम व्यक्त करण्याच्या आप्पासाहेब पाटील यांच्या कुटुंबीयांचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे.
आप्पासाहेब पाटील हे स्वत: निसर्गप्रेमी शेतकरी. घरची परिस्थिती समृद्ध असतानाही केवळ निसर्गप्रेमापोटी त्यांनी घराशेजारील रिकाम्या जागेत नर्सरीही तयार केली आहे. कुणाला विकत, तर झाडे लावण्याची इच्छा आहे, पण आर्थिक कुवत नाही, अशांना फुकट रोपे देऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
पाटील यांच्या प्राध्यापक मुलीचा विवाह रविवारी आजरा येथे मोठ्या थाटात पार पडला. वैशिष्ट्य म्हणजे या लग्नाकरिता उभारण्यात आलेला मंडप, डेकोरेशन पूर्णत: नैसर्गिक रोपांच्या व फुलांच्या साहाय्याने तयार करण्यात आला होता. लग्नसोहळ्यास जिल्हाभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. सोहळ्यास येणाऱ्या स्त्री-पुरुष पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचा आहेर अथवा भेटवस्तू न देता पाटील कुटुंबीयांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची रोपे भेट स्वरूपात दिली. (प्रतिनिधी)