Plastic ban: 'प्लास्टिक बंदीचे स्वागतच, पण लगेच कारवाई नको, मुदत द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:17 PM2022-06-30T12:17:19+5:302022-06-30T12:18:01+5:30
आम्ही कायदा पाळूनच व्यवसाय करू, अशी ग्वाही
कोल्हापूर : सिंगल युज प्लास्टिक बंदीला आमचा पाठिंबाच आहे, पण लगेच १ जुलैपासून कारवाई करू नका, मुदत द्या, सर्व्हे करा, चौका-चौकात जागृतीचे फलक लावून प्रबोधन करा, प्लास्टिक उत्पादकांवर कारवाई करा, असे म्हणणे कोल्हापुरातील उद्योजकांनी बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले. आम्ही कायदा पाळूनच व्यवसाय करू, अशी ग्वाही देखील दिली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे बुधवारी उद्यम नगरातील कार्यालयात प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांचे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी उद्योजकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, सिंगल युज प्लास्टिकवर बंदी करावी लागणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे असे सांगून, ईपीआर नोंदणीकृत व मान्यताप्राप्त उत्पादकांकडूनच प्लास्टिक घेऊन त्याचाच वापर करा, अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी उद्योजकांना दिल्या. बेकायदेशीर उत्पादकांकडून प्लास्टिक अजिबात घेऊ नका, तसे आढळल्यास कडक कारवाई करू, असेही बजावले.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिलेल्या प्लास्टिक पाउचवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार नाही. तसेच फूड लायसन्ससंबंधित व्यापाऱ्यांची पुन्हा कार्यशाळा आयोजित करू, असे सांगितले.
यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव वैभव सावर्डेकर, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी संजय मोरे, कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, संचालक राहुल नष्टे, प्रकाश केसरकर, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, अनिल धडाम, हुपरी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश इंग्रोळे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, सिध्दार्थ लाटकर, किराणा भुसार असोसिएशनचे बबन महाजन, संदीप वीर व विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी मानले. सूत्रसंचालन मानद सचिव धनंजय दुग्गे यांनी केले.
प्लास्टिक बंदीचे स्वागतच, पण...
कोविडमुळे व्यापाऱ्यांना आधीच फार मोठा फटका बसला असून त्यातून बाहेर पडण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. शासनाने आणलेल्या बंदीचे आम्ही स्वागतच करतो. प्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील प्लास्टिक उत्पादकांचा सर्व्हे करून त्या उत्पादकांना प्लास्टिक बंदीबाबत सूचना द्याव्यात. कोणते प्लास्टिक चालते व कोणते चालत नाही, याची माहिती द्या, त्याचे शहरातील मोठ्या चौकामध्ये तसेच व्यवसायाच्या ठिकाणी पोस्टर्स करून लावू. - संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी हे दिले आदेश...
- जिल्ह्यात असलेल्या बेकायदेशीर उत्पादकांची यादी द्या, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करू.
- बगॅस, कागदापासून केलेले मटेरियल वापरावयास चालते, पण पॉलिथीन असलेले मटेरियल अजिबात चालणार नाही.
- एकदाच वापरून फेकले जाणारे सिंगल युज प्लास्टिक अजिबात चालणार नाही.
- हॅण्डल कॅरिबॅगवर शंभर टक्के बंदी आहे.
- उत्पादकाने उत्पादित केलेले प्लास्टिक कसे परत घ्यायचे, ही ज्या त्या उत्पादकाची जबाबदारी आहे.