राजेश क्षीरसागर यांचे जल्लोषात स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, मोटारसायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:25 PM2019-06-21T13:25:37+5:302019-06-21T13:26:51+5:30
राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर निवडीनंतर आमदार राजेश क्षीरसागर यांचे गुरुवारी शिवसैनिकांनी कोल्हापुरात जल्लोषी वातावरणात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
कोल्हापूर : राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर निवडीनंतर आमदार राजेश क्षीरसागर यांचे गुरुवारी शिवसैनिकांनी कोल्हापुरात जल्लोषी वातावरणात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
दुपारी बाराच्या सुमारास आमदार क्षीरसागर यांचे छत्रपती ताराराणी चौक येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने औक्षण करण्यात आले. यानंतर आमदार क्षीरसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर सरिता मोरे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेवक नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, आदींनी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शिवसैनिकांनी क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर ढोलताशांच्या गजरात मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. उघड्या जीपवर आमदार क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी होते. ही रॅली दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, सीपीआर चौक, छत्रपती शिवाजी चौक, पापाची तिकटीमार्गे शिवसेना शहर कार्यालय अशी काढण्यात आली. दरम्यान, क्षीरसागर यांनी रॅलीमार्गावरील छत्रपती राजाराम महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीमार्गावर ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
यावेळी किशोर घाटगे, अमर समर्थ, सुनील जाधव, महेश उत्तुरे, जयवंत हारुगले, प्रकाश सरनाईक, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, सुनील खोत, अजित राडे, किशोर घाटगे, मंगल साळोखे, पूजा भोर, आदी उपस्थित होते.
क्षीरसागर यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
दरम्यान, रॅलीनंतर आमदार क्षीरसागर यांनी सहकुटुंब करवीरनिवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, स्नुषा दिशा क्षीरसागर उपस्थित होते.