सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या संभाजीराजेंचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:10+5:302021-06-26T04:18:10+5:30
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा रेटत त्यातील बहुतांशी मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. त्यानंतर संभाजीराजे उद्या, ...
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा रेटत त्यातील बहुतांशी मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. त्यानंतर संभाजीराजे उद्या, रविवारी कोल्हापुरात येत असून त्यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती बाळ घाटगे यांनी पत्रकातून दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी १६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळावर मूक आंदोलन करून आरक्षण प्रश्नांची मशाल पेटवली. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने संभाजीराजे यांना भेटीची वेळ देऊन समाजाच्या बहुतांशी मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ही संभाजीराजे यांच्या आंदोलनाची मोठी जमेची बाजू आहे. उर्वरित मागण्यांसाठी त्यांनी शासनाला अवधी दिला आहे. तरीही आंदोलन सुरुच राहणार आहे, कोणत्याही प्रश्नांसाठी शासनविरोधी आंदोलन करत असताना चर्चेची दारे उघडी ठेवून आंदोलन करायचे असते, त्यातून मूळ प्रश्नांची सोडवणूक होते.
बहुतांशी मागण्यांची अंमलबजावणी सुरू करायला लावून संभाजीराजे उद्या, कोल्हापुरात येत आहेत. त्यानिमित्ताने दुपारी चार वाजता जुना राजवाडा, भवानीमंडप येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याचे बाळ घाटगे, चंद्रकांत पाटील, राजू सावंत, बाबा महाडीक, प्रसाद जाधव, सुनीता पाटील यांनी पत्रकातून दिली.
आज पालकमंत्र्यांना निवेदन
विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडावा, या मागणीसाठी आज, शनिवारी सकाळी साडेसात वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळी पालकमंत्री सतेज पाटील यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.