शक्तीप्रदर्शनाने ठाकरे यांचे स्वागत
By admin | Published: November 3, 2014 12:29 AM2014-11-03T00:29:18+5:302014-11-03T00:42:27+5:30
शिवसैनिकांमध्ये अपूर्व उत्साह : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील आमदार, कार्यकर्त्यांची उपस्थिती
कोल्हापूर : ‘कोण आला रे, कोण आला... शिवसेनेचा वाघ आला’, ‘शिवसेना झिंदाबाद’, अशा जोरदार घोषणा, भिरभिरणारे भगवे ध्वज अशा जल्लोषी वातावरणात आज, रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांनी कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी याठिकाणी गर्दी केली होती. यावेळी मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या चंद्रदीप नरके यांच्यासह इतर आमदारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते, पदाधिकारी विमानतळावर येऊ लागले. तासाभरातच डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात स्कार्फ आणि हातात भगवा ध्वज घेतलेल्या कार्यकर्त्यांनी परिसर फुलून गेला. त्यात महिला कार्यकर्त्यांचादेखील समावेश होता. विमानतळापासून दीड किलोमीटर परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी बारा वाजता उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत पत्नी रश्मी ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर होते. याठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, विजय शिवतारे, विटाचे आमदार अनिल बाबर, पाटणचे आमदार शंभूराजे देसाई, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा उपसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, मुरलीधर जाधव, शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, आदी उपस्थित होते. ठाकरे हे विमानतळाच्या इमारतीतून बाहेर येताच कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे, कोण आला... शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांना अभिवादन करून ते दुपारी पावणेएकच्या सुमारास अंबाबाईच्या दर्शनासाठी मोटारीतून शहराच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बेळगावात केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. शिष्टमंडळात बेळगावचे माजी उपमहापौर प्रकाश शिरोडकर, बंडू केरबडकर, प्रवीण तेजम, बाळासाहेब डंगरले, राजकुमार बोकाडे, राजू कुडेकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांच्या घाईने गोंधळ...
विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कोल्हापुरात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. त्यांनी गर्दी केली होती. विमानतळाच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी अकरा वाजल्यापासून कार्यकर्त्यांची घाई सुरू होती. विमान आल्यानंतर कार्यकर्त्यांची गडबड अधिकच वाढली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसमवेत त्यांच्यातील काहींची शाब्दिक वादावादी झाली. पोलिसांचे कडे तोडून आत जाण्याच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आमदार राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, आदी आवाहन करत होते. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हते. त्यांच्यातील शिस्तीच्या अभावामुळे याठिकाणी गोंधळ निर्माण झाला.