तृतीयपंथीयांसाठी हवे कल्याणकारी मंडळ

By admin | Published: August 19, 2016 12:19 AM2016-08-19T00:19:27+5:302016-08-19T00:35:26+5:30

योजनांपासून वंचित : संख्या निश्चितीसाठी सर्वेक्षणाची गरज

Welfare Board for third parties | तृतीयपंथीयांसाठी हवे कल्याणकारी मंडळ

तृतीयपंथीयांसाठी हवे कल्याणकारी मंडळ

Next

इंदुमती गणेश -- कोल्हापूर ‘तृतीयपंथी’ म्हटले की ‘साडी नेसलेला पुरुष’ म्हणून हेटाळणी होती. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या मंडळामुळे तृतीयपंथीयांचे मानवी हक्क अबाधित राहून त्यांना सर्वसामान्य जीवन जगता येऊ शकेल असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या साधना झाडबुके यांनी तशी लेखी मागणी मुख्यमंत्र्यांकडेही केली आहे.
समाजात स्त्री-पुरुषांना मान आहे मात्र तृतीयपंथीयांना बीभत्स नजरांचा सामना करावा लागतो. ‘आई खाऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही,’ अशी त्यांची अवस्था आहे. दैनंदिन आयुष्य जगताना विचित्र नजरा त्यांना झेलाव्या लागतात. पुरुषांकडून त्रास सहन करावा लागतो, जाता-येता अश्लील भाषेतील टोमणे ऐकावे लागतात. स्त्री म्हणून काम करू शकत नाही पुरुष म्हणून नोकरी, व्यवसाय करू शकत नाही. काही धडपड केलीच तर समाज सन्मानाने जगू देत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे.
शासनाच्या प्रत्येक अर्जात, नियमावलीत स्त्री आणि पुरुष असे दोन पर्याय, तृतीयपंथीयांच्या नावाला स्थानच नाही. या सगळ््यामुळे व्यक्ती म्हणून सर्वसामान्य जीवन जगण्याचा त्यांचा अधिकारच नष्ट करण्यात आला. या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याने जुलैमध्ये स्त्री-पुरुष आणि तृतीयपंथी असे तीन कॉलम करण्यात आले व तृतीयपंथीयांना इतर मागासवर्गीयाप्रमाणे सर्व योजनांचा लाभ द्यावा, असे नमूद करण्यात आले.
विशेष सहाय्य विभागातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ अनुदान योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये तृतीयपंथीयांनाही सहभागी करावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, तृतीयपंथी नक्की कोणाला म्हणायचे हे संबंधित खाते ठरवू शकत नाही. त्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी लागणार आहे. याद्वारे तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून तसे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावेत. या आधारावर त्यांना दत्तक, विवाह, पालकत्व, शैक्षणिक, नोकरी, यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.


तृतीयपंथीयांना समाजाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना शैक्षणिकसह आर्थिक, सामाजिक स्तरावर समान न्याय दिला पाहिजे. त्यासाठी शासन पातळीवर कल्याणकारी मंडळाची स्थापना होणे गरजेचे आहे. कोल्हापुरात ही सुरुवात झाली तर राज्यासमोर नवा आदर्श निर्माण होईल
- प्रा. साधना झाडबुके,
सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: Welfare Board for third parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.