पवित्र आचार-विचाराने जीवनाचे कल्याण करा
By admin | Published: February 6, 2015 12:51 AM2015-02-06T00:51:07+5:302015-02-06T00:54:56+5:30
समर्पणसागर महाराज : महोत्सवासाठी सहकार्याबद्दल मानले आभार
बाहुबली : बाहुबली ब्रह्मचर्याश्रम विद्यापीठ व भगवान बाहुबली महामूर्तीचे प्रतिष्ठापक गुरुदेव समंतभद्र महाराज यांनी दिलेल्या उपदेशानुसार संस्थेचे कार्य सुरू आहे. लौकिक प्रगतीसोबत धार्मिक भावनेसाठी होत असलेले प्रयत्न गरजेचे आहेत. सर्वांनी आचार व विचार पवित्र ठेवून जीवनाचे कल्याण करून घेण्यासाठी स्वयंस्फूर्त प्रयत्न करावे, असे आशीर्वचन क्षुल्लक समर्पणसागर महाराजांनी प्रवचनात दिले. १००८ भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा सर्व घटकांच्या सर्वोत्तम सहकार्याने यशस्वी झाला. त्याबद्दल समर्पणसागर महाराजांनी सर्वांचे आभार मानले.महोत्सवात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला. महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष डी. सी. पाटील यांनी महामस्तकाभिषेक कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी पू. १०८ गुरुदेव समंतभद्र महाराजांचे आशीर्वाद असल्याने हा समारंभ यशस्वी झाला. त्याशिवाय आचार्य वर्धमानसागर महाराज, श्रीभद्र महाराज, क्षुल्लक समर्पणसागर महाराज, आर्थिक ज्ञानमती माताजी व आर्थिका मुक्ती लक्ष्मी माताजी व मुनी संघाच्या उपस्थितीत महोत्सव होणे अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. समाजातील दानशूर, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, बाहुबली विद्यापीठातील शाळांचे मुख्याध्यापक, अध्यापक, अध्यापिका, यांनी तीन महिने घेतलेले परिश्रम, पोलीस यंत्रणेने केलेले काटेकोर नियोजन, आरोग्य विभागाचे मदत केंद्र, लाखो भाविकांच्या आहाराची व्यवस्था करणारे गुरुकुल स्नातक, शासकीय अधिकारी, परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध सहकारी संस्था यांच्या परिश्रमाबद्दल समितीच्यावतीने आभार मानले. यावेळी डॉ. नेमिनाथ बाळीकाई यांच्या ‘बाहुबली इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी खा. दिलीप गांधी, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार वीरकुमार पाटील, समितीचे सहकार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, आमदार संजय पाटील (बेळगाव), प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील (यड्रावकर), रावसाहेब पाटील, सभापती राजेश पाटील, सरपंच माधवी माळी, बाळासाहेब गारे, जिल्हा परिषद सदस्य संतोष माळी, सरपंच विनोद कांबळे यांचा खासदार राजू शेट्टी, आमदार संजय पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, खासदार दिलीप गांधी, आमदार जयंत पाटील यांनी विचार मांडले.
याप्रसंगी संचालक बी. टी. बेडगे, पी. एम. पाटील, सुभाष रजपूत, बलराम महाजन, रवींद्र खोत, रमेश देसाई, आप्पासोा चौगुले, जवाहरचे उपाध्यक्ष बाबासोा चौगुले, अनिल भोकरे, प्रकाश पाटील, कलगोंडा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, धनराज बाकलीवाळ, सनतकुमार आरवाडे, मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, पी. ए. मगदूम, महावीर लठ्ठे, आप्पासाहेब भगाटे, रायचंद हेरवाडे, आदीं उपस्थित होेते.
मेपर्यंत महामस्तकाभिषेक
महोत्सवादरम्यान ज्यांना महामूर्तीवर अभिषेक करण्यासाठी उपस्थित राहता आले नाही अथवा अभिषेक करता आला नाही, अशा श्रावकांना संधी मिळावी यासाठी मे महिन्यापर्यंत प्रत्येक रविवारी मस्तकाभिषेकाचे आयोजन केले आहे. याचा लाभ श्रावकांनी घ्यावा, असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष डी. सी. पाटील यांनी केले आहे.