असंघटित क्षेत्रातील ४ कोटी कामगारांचे वर्षभरात कल्याण - कामगार मंत्री हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 04:30 PM2022-04-09T16:30:27+5:302022-04-09T16:31:01+5:30

किती नेते आणले, फुगा फुगवला, हवा केली तरी १६ तारखेला हा फुगा फुटणारच आहे आणि कोल्हापूरची जनताच तो फोडेल असा विश्वास आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

Welfare of 4 crore workers in unorganized sector during the year says Labor Minister Hasan Mushrif | असंघटित क्षेत्रातील ४ कोटी कामगारांचे वर्षभरात कल्याण - कामगार मंत्री हसन मुश्रीफ

छाया : नसीर अत्तार

Next

कोल्हापूर : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील चार कोटी लोकांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने आपल्या खांद्यावर घेतली आहे. बांधकाम कामगारांच्या धर्तीवर इतर कामगारांचे महामंडळाच्या माध्यमातून कल्याण वर्षभरात करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कामगार कष्टकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

कोल्हापूर उत्तरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ केशवराव भोसले नाट्यगृहात घरेलू कामगार, रिक्षाचालक, कामगार यांच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळ कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, दिलीप पवार, आर.के.पोवार, गुलाबराव घोरपडे, संजय पवार व विजय देवणे, रमेश बागवे, सुशीला यादव, रिक्षा संघटनेचे राजू जाधव, सुभाष शेट्ये, सतीशचंद्र कांबळे उपस्थित होते.

चंद्रकांत जाधव यांनी केलेली कामे, सर्वसामान्यांचे मिळवलेले आशीर्वाद या बळावर जयश्री जाधव याच बहुमताने निवडून येणार असा विश्वास व्यक्त करून मुश्रीफ यांनी कामगार मंत्री या नात्याने सर्व कामगारांचे कल्याण करण्याचे आपले धोरण आहे. घरेलू मोलकरीण, ड्रायव्हर, शेतमजूर यांना कल्याणकारी मंडळाच्या कक्षेत सामावून घेतले जाणार आहे. वर्षभरातच ही सर्व कामे मार्गी लावली जातील असे सांगितले.

उमेदवार जयश्री जाधव यांनी आण्णांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला साथ द्या, मी बिचारी नाही, खंबीर आहे, तुम्ही साथ दिली तर मी सेवेत कोणतीही कसर ठेवणार नाही असे भावनिक आवाहन केले. दिलीप पवार यांनी पहिली महिला आमदार निवडून देऊन इतिहास घडविण्याची संधी आली आहे, ती दवडू नका असे आवाहन केले.

भाजपचा फुगा जनताच फोडेल: राेहित पाटील

कोल्हापुरात होऊ घातलेले ज्योतिषी खूप असलेतरी शिव, शाहूंच्या या भूमीत जयश्री जाधव यांचा विजयरथ कोणी रोखू शकणार नाही. किती नेते आणले, फुगा फुगवला, हवा केली तरी १६ तारखेला हा फुगा फुटणारच आहे आणि कोल्हापूरची जनताच तो फोडेल असा विश्वास आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

निष्ठावंत शिवसैनिकांना मातोश्रीचा आदेेश अंतिम

निष्ठावंत शिवसैनिकांना मातोश्रीचा आदेश हाच अंतिम असतो. उद्धव ठाकरे यांनी तो आदेश दिला आहे, त्यांचे पालन निष्ठावंत शिवसैनिक करणारच आहेत, भाजप जाणीवपूर्वक संभ्रमावस्था निर्माण करत आहे. जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी सच्चा शिवसैनिकांची राहील अशी ग्वाही शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांना हिमालयात पाठवूया

मेळाव्यात आलेल्या प्रत्येकाने एक एक रुपया जमा करावा, या पैशातून गाडी करून चंद्रकांत पाटील यांना हिमालयात पाठवून देऊयात अशी खोचक टिप्पणी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी केली.

Web Title: Welfare of 4 crore workers in unorganized sector during the year says Labor Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.