टँकरने भरली जाणारी विहीर आता तुडुंब...
By admin | Published: August 7, 2016 12:21 AM2016-08-07T00:21:33+5:302016-08-07T01:01:57+5:30
वेळूची टँकरमुक्तीकडे वाटचाल : गावाच्या शिवारात पाणी खेळू लागले; जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात
सातारा : टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये टँकर ओतून याच विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असे. तीच विहीर आज गावात झालेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान अंतर्गत कामांमुळे तुडुंब भरली आहे. वेळूच्या शिवारात जागोजागी पाणी खेळले आहे. सध्या सुरू असणाऱ्या पाझर तलाव जोड प्रकल्पाने गाव निश्चितच टँकरमुक्त झाले आहे.
अवघ्या १५११ लोकसंख्येचे वेळू हे गाव. या गावामध्ये राज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान अंतर्गत आणि श्रमदानातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या गावात ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धाही घेण्यात आली. ४४५ कुटुंब संख्या असणाऱ्या या गावात ३११ शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. मनुष्यबळाद्वारे ९२४.३१ घनमीटर सीसीटीचे काम तर १७ हजार ६७० घनमीटर डीपसीसीटीचे काम यंत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ६ गॅबियन बंधारे, २९ माती नालाबांध, कंपार्टमेंट बंडिंग त्याचबरोबर खोलीकरण, रुंदीकरण, पाणीसाठा गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आणि शेततळी यांचा यामध्ये समावेश आहे.
गावातील सार्वजनिक विहिरीत टँकर ओतून गावाला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या गावात झालेल्या कामांमुळे काही दिवसांपूर्वी कोरड्या असणाऱ्या या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. गावची टंचाई कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी यांत्रिकी विभागामार्फत तलाव जोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
गावामध्ये ४ पाझर तलाव
गावामध्ये ४ पाझर तलाव आहेत. यामधील बेलेवाडीमध्ये असणारा पाझर तलाव हा वरच्या बाजूला आहे आणि तो नेहमी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असतो. सध्या जलरोधी चर काढून या पाझर तलावांमधील गळती रोखण्यात आली आहे. त्याचबरोबर तलावातील गाळही काढण्यात आला आहे. या कामांमुळे आणि झालेल्या पावसांमुळे सध्या या तलावामध्ये समाधानकारक पाण्याची पातळी झाली आहे. बेलेवाडीतून ओसंडून वाहणारे अतिरिक्त पाणी खाली असणाऱ्या पाझर तलावांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यासाठी ७५० मीटर पाईपद्वारे हे दोन्ही पाझर तलाव जोडण्यात येत आहेत, अशी माहिती यंत्रिकी विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रकाश भोसले यांनी दिली.