बहुचर्चित शिवाजी चौक सुशोभीकरण पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:41 AM2019-08-27T10:41:18+5:302019-08-27T10:43:34+5:30
क्रांतिपर्वाचा साक्षीदार आणि ऐतिहासिक वारसा म्हणून नावलौकिकप्राप्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याचे तसेच चौकाच्या सुशोभीकरणाचे काम आता पूर्णत्वाकडे झुकले असून, लोकार्पणाचा डामडौल टाळून साधेपणाने दि. १ सप्टेंबर रोजी त्याचे लोकार्पण होत आहे.
कोल्हापूर : क्रांतिपर्वाचा साक्षीदार आणि ऐतिहासिक वारसा म्हणून नावलौकिकप्राप्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याचे तसेच चौकाच्या सुशोभीकरणाचे काम आता पूर्णत्वाकडे झुकले असून, लोकार्पणाचा डामडौल टाळून साधेपणाने दि. १ सप्टेंबर रोजी त्याचे लोकार्पण होत आहे.
सुशोभीकरणानंतर छत्रपतींचा हा पुतळा व चौक नव्या पिढीला क्रांतीची तसेच शौर्याची प्रेरणा देत राहील, इतका तो नावीन्यपूर्ण तसेच आकर्षित करण्यात आला आहे.
चित्रतपस्वी कै. भालजी पेंढारकर यांनी भारतीय स्वातंत्र्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास प्रेरणादायी ठरावा म्हणून शिवाजी चौकात छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. परंतु गेल्या अनेक वर्षात चौकाचे सुशोभीकरण झाले नव्हते.
शहरातील एक महत्त्वाचा चौक असूनही त्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नव्हते. या दुर्लक्षित चौकाचे महत्त्व ओळखून आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
आमदार क्षीरसागर यांनी शहरवासीयांना तसेच इतिहासप्रेमींना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून आर्कि टेक्ट सूरज जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून संकल्पचित्र तयार करून घेतले.
अनेकांच्या सूचनेतून तयार करण्यात आलेल्या संकल्पचित्राच्या आधारे पुतळ्याचे तसेच चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, तसेच आमदार क्षीरसागर यांनी या कामासाठी ९० लाख रुपये उपलब्ध करून दिले.
पूर्वीच्या चबुतऱ्यात कोणताही बदल केला नसला तरी फौंडेशन, परिसर विकास, ब्रॉँझमध्ये तयार केलेले म्युरल्स अशी त्याची संकल्पना आहे. ५० फूट लांबीची भिंत आणि त्यावर शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित चित्रे कोरण्यात आली आहेत. राजमुद्रा व आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.
प्रत्येक विषयात जसे वाद निर्माण होतात; तसा वाद सुशोभीकरणाच्या कामातही निर्माण झाले. पुतळ्याच्या ठिकाणी मावळा व कुत्र्याचे शिल्प नको म्हणून मागणी झाली. मूळ चबुतरा बदलला जाऊ नये म्हणूनही वाद घातला गेला. त्यामुळे त्यात काही बदल करण्यात आले. सर्वांच्या सूचना व अपेक्षांना वाव देत हे सुशोभीकरण एकदाचे पूर्ण झाले.
साधेपणाने होणार लोकार्पण
या कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, महापुराच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची भव्यता टाळून साधेपणाने लोकार्पण होणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत दि. १ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात आमदार क्षीरसागर त्यांच्या मतदारसंघातील महापुरात अंशत: पडझड झालेल्या कुटुंबीयांना पाच हजार, तर पूर्णत: घर पडलेल्यांना दहा हजार रुपयांची वैयक्तिक मदत करणार आहेत.