छे...छे नैसर्गिक नाले नव्हे...ही तर गटारगंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:12+5:302021-03-24T04:21:12+5:30
अमर पाटील : कधीकाळी कात्यायानी टेकड्यातून स्वच्छ पाण्याने खळाळून वाहणारे नैसर्गिक नाले आता गटारगंगा बनल्याचे चित्र आहे. या नाल्यांवर ...
अमर पाटील : कधीकाळी कात्यायानी टेकड्यातून स्वच्छ पाण्याने खळाळून वाहणारे नैसर्गिक नाले आता गटारगंगा बनल्याचे चित्र आहे. या नाल्यांवर झालेले अतिक्रमण, नागरी वस्त्यांमधून सोडणारे सांडपाणी यामुळे नैसर्गिक नाल्यांचे पाणी प्रचंड दूषित बनले आहे. रंकाळा तलावाला येऊन मिळणाऱ्या आसपासच्या परिसरातील बारा नाल्यांचीही हीच अवस्था असल्याने या दोन्ही तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उपनगरातील विविध प्रभागातून लहान-मोठे नैसर्गिक नाले बारमाही वाहतात. एकेकाळी स्वच्छ पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या या नैसर्गिक नाल्यांमध्ये आजमितीला अस्ताव्यस्त वाढत्या नागरी वस्त्यांचा घनकचरा, सांडपाणी मिसळत असल्याने हे नाले आहेत की गटारगंगा असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरी वस्त्या अपार्टमेंट व विविध व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रक्रिया न करता सांडपाणी पाणी थेट नाल्यात सोडले जाते. नाल्यावर अतिक्रमणे करून नैसर्गिक नाले वळविण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी नालेच बुजविण्यात आले आहेत. मात्र, याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या नाल्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
नैसर्गिक नाले प्रदूषित झाल्याने येथील रहिवासी क्षेत्रात प्रचंड दुर्गंधी पसरली असून वर्षभर डासांचे थैमान असते. त्यामुळे या नैसर्गिक नाल्यांची होणारी दुर्दशा दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रदूषण थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कोट : अस्ताव्यस्त वाढणाऱ्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी नियोजन न केल्याने नैसर्गिक नाल्यांची गटारगंगा झाली आहे. राजलक्ष्मी नगरात तर प्रतिवर्षी नाले तुंबून पावसाळ्यात नागरी वस्तीत पाणी शिरले होते. क्रेशेर चौक ते संभाजीनगर, देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो. नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी.
- सुधीर राणे, राजलक्ष्मीनगर