सोनाळीला पाणी पुरवठा करणारी विहीर झाली गाळमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:39+5:302021-04-12T04:21:39+5:30
बोरवडे : सोनाळी (ता. कागल) गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहीर आणि टाकीमध्ये साचलेल्या गाळामुळे गावाला दूषित पाण्याचा ...
बोरवडे : सोनाळी (ता. कागल) गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहीर आणि टाकीमध्ये साचलेल्या गाळामुळे गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. याची दखल घेत गावातील सहजसेवा फौंडेशनच्या सदस्यांनी श्रमदान करून ही विहीर गाळमुक्त केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावाला आता पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
डोंगरकपारीत वसलेल्या सोनाळी गावाला नदीऐवजी सार्वजनिक विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. विहिरीतील पाणी पंपाद्वारे उपसा करुन टाकीत सोडले जाते आणि तेथून ते नळाद्वारे ग्रामस्थांना दिले जाते. परंतु मागील काही दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार होती. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करीत ग्रामसभेत हा मुद्दा अनेक वेळा उचलून धरला होता.
ग्रामपंचायतीकडून याबाबतीत होणारे दुर्लक्ष विचारात घेऊन सहजसेवा फौंडेशनच्या सदस्यांनी या विहीर आणि टाकीतील गाळ श्रमदानाने काढण्याचे ठरवले. फौंडेशनच्या सदस्यांनी स्वतः विहिरीत उतरत जेसीबी मशीनच्या साहाय्याने विहिरीतील गाळ काढला. श्रमदानातून विहीर गाळमुक्त झाल्याने गावाला आता पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे.
यासाठी फौंडेशनचे अध्यक्ष शिवाजी बचाटे, विनायक म्हातुगडे, उत्तम पोकलेकर, अनिल सुतार, जी.आर. लोंढे, मधुकर भोसले, प्रवीण खोळांबे, धनाजी पोवार, कुंडलिक धनवडे, सुनील खोळांबे, आदेश पाटील,रणजित वैद्य, भिकाजी बचाटे, ज्ञानदेव लोंढे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले. त्यांना सरपंच तानाजी कांबळे, उपसरपंच सुवर्णा भोसले, ग्रामसेवक सुनील गुजर यांच्यासह सर्व ग्रा.पं. सदस्य व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
फोटो ओळी :
सोनाळी (ता. कागल) येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीतील गाळ जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढताना सहजसेवा फौंडेशननचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य.