मारहाणीची सुपारी द्यायला गेला अन् स्वत:च जीव गमावून बसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 01:16 AM2019-12-29T01:16:05+5:302019-12-29T01:16:45+5:30
त्याठिकाणी संशयावरून गृहरक्षक दलाचे जवान व काही नागरिकांनी त्यांना अडविले. अधिक चौकशी केली असता संशय बळावल्याने शिवाजीनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन हैदर यास आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
इचलकरंजी : मोबाईल चोरी केल्याचा संशय असलेल्या कामगारास मारहाण करण्याची सुपारी देणाऱ्या मित्रालाच त्याच्या दोन मित्रांनी दगडाने ठेचून ठार केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री येथील आरगे मळ्यात घडली.
चित्रपटदृष्याला लाजवेल अशा या घटनेतील मृताचे नाव हैदर शहानूर कलावंत (वय २४, रा. गणेशनगर) असे आहे. त्याचा खून करणाºया गणेश नारायण इंगळे (वय २३, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) व योगेश हणमंत शिंदे (२३, रा. गणेशनगर) या दोन संशयितांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही पोलीस रेकॉर्डवर गुन्हेगार आहेत.
याबाबत माहिती अशी की, हैदर, योगेश व गणेश हे तिघे मित्र आहेत. हैदर हा यंत्रमाग कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करीत होता. कामाच्या ठिकाणाहून त्याचा मोबाईल चोरीस गेला होता. तो मोबाईल एका कामगाराने घेतल्याचा संशय त्याला होता. शोधाशोध व मागणी करूनही मोबाईल मिळत नसल्याने हैदरने गणेश व योगेश या दोघा मित्रांना दारू व पैसे देतो, असे सांगून संबंधित कामगारास मारहाण करण्यास सांगितले. त्यानुसार हैदरने एका जागी थांबून गणेश व योगेशला संबंधित कामगारास मारण्यासाठी पाठविले. त्या दोघांनी कामगारास मारहाण केली असता, त्याने आरडाओरडा केल्याने तेथील नागरिकांनी जमून त्या दोघांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास शहापूर परिसरात घडली.
दरम्यान, ठरल्यानुसार हैदर हा गणेश व योगेश या दोघांसह मद्यप्राशन करण्यासाठी आरगे मळ्यातील एका मोकळ्या मैदानात बसला होता. मद्यप्राशन केल्यानंतर त्या दोघांनी पैशाची मागणी केली. त्यावेळी या तिघांमध्ये वाद झाला. या वादातून चिडून पेव्हिंग ब्लॉक तसेच दगडाने योगेश व गणेश यांनी हैदरवर हल्ला केला. डोक्यात, डोळ्यावर व छातीवर वर्मी घाव बसल्याने तो जखमी झाला. मृत्यू झाल्याचे समजून या दोघांनी पोलिसांच्या भीतीने त्याला अन्यत्र ठिकाणी नेऊन टाकायचे म्हणून मोटारसायकलवर दोघांच्या मध्ये बसवून घेतले.
आरगे भवन परिसरातून हे तिघेजण राजवाडा चौकातून कर्नाटकच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी एका पोलिसाने त्यांना संशयावरून हटकले. मात्र, त्या दोघांनी आमचा मित्र जखमी असून, त्याला रुग्णालयात नेत आहोत, असे त्या पोलिसाला सांगितले. तेथून पुढे ते जुना चंदूर रोड परिसरात गेले. त्याठिकाणी संशयावरून गृहरक्षक दलाचे जवान व काही नागरिकांनी त्यांना अडविले. अधिक चौकशी केली असता संशय बळावल्याने शिवाजीनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन हैदर यास आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत शिवाजीनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती; पण चौकशीअंती खुनाची घटना उघडकीस आली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी भेट दिली. अधिक तपास गावभाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत. मृत हैदर हा अविवाहित असून, त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. घटनास्थळाचा पंचनामा हैदर याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रक्ताने माखलेले पेव्हिंग ब्लॉक व दगड ताब्यात घेतले.
- शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा
मृत हैदरचे नातेवाईक व नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर शनिवारी मोर्चा काढून पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांची भेट घेतली. त्यावेळी या खुनातील संशयित आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली. यावेळी गणेशनगर, विक्रमनगर, आदी भागांत गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ओमासे यांनी सांगितले.