पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राज्यात श्रीमंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:06 AM2019-07-15T01:06:03+5:302019-07-15T01:06:07+5:30
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील विविध देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी राजे-राजवाड्यांनी दिलेल्या इनाम जमिनींमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ...
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील विविध देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी राजे-राजवाड्यांनी दिलेल्या इनाम जमिनींमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती राज्यातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान ठरले आहे. समितीकडे कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील २७ हजार ९८० एकर जमिनी आहेत. त्यापाठोपाठ तुळजापूर देवस्थानची तीन हजार ४३६ एकर जमीन आहे. त्यानंतर शिखर शिंगणापूर आणि पंढरपूर या देवस्थानांचा नंबर लागतो.
श्रद्धेपोटी व देवस्थानांची दिवाबत्ती, नित्य नैमित्तिक धार्मिक विधी विनासायास पार पडावेत यासाठी प्राचीन काळापासून अनेक राजवटींनी देवस्थानांना जमिनी इनाम म्हणून दिल्या. म्हणूनच या जमिनींच्या दस्तऐवजावर, सात-बारावर मालक म्हणून त्या त्या देवांचे नाव आहे. इस्लामी आक्रमणांच्या काळातही देव आणि मंदिरे असुरक्षित होती; पण देवस्थानांच्या कारभारात फेरफार झाला नाही. त्यामुळे देवस्थानांच्या इनाम जमिनी अबाधित आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील तीन हजार ६४ मंदिरे असून, समितीतर्फे त्यांचे व्यवस्थापन केले जाते. त्यात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा व वाडी रत्नागिरी येथील जोतिबा या दोन प्रमुख मंदिरांचा समावेश आहे. मात्र, या दोन्ही मंदिरांच्या तुलनेत उदगिरी (ता. शाहूवाडी) येथील काळम्मादेवीची सर्वाधिक जमीन आहे. त्यापाठोपाठ शाहूवाडीतीलच कासार्डे येथील श्री धोपेश्वर मंदिराचा नंबर लागतो.
तुळजाभवानी मंदिराच्या जमिनी चार मठ संस्थानांना देवीच्या सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. या उत्पन्नातून त्यांनी देवीची सेवा करायची आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराची ९०० एकरहून अधिक जमीन १२ जिल्ह्यांमध्ये आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील इनाम जमिनी
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील तीन हजार ६४ मंदिरांची मिळून २७ हजार ९८० एकर जमीन
उदगिरी (ता. शाहूवाडी) काळम्मादेवी मंदिर : पाच हजार ७०८ एकर
कासार्डे (ता. शाहूवाडी, ) येथील धोपेश्वर मंदिर : दोन हजार ३२ एकर
वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवस्थान : एक हजार २२३.८६ एकर
श्री अंबाबाई मंदिर :
२४१ एकर (कोल्हापूर )
अन्य देवस्थानांकडील जमिनी
श्री तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर) : तीन हजार ४३६ एकर. (उस्मानाबाद, सोलापूर, मोहोळ, बार्शी परिसरात)
श्री शंभूमहादेव मंदिर (शिखर शिंगणापूर) : एक हजार ७०० एकर (शिंगणापूर, माण, सातारा परिसर)
श्री विठ्ठल मंदिर (पंढरपूर) : ९०० एकर (सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा नागपूर, नगर, बुलढाणा.)