पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती काँग्रेसकडे जाणार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:36+5:302021-06-24T04:17:36+5:30

विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काँग्रेसकडे असलेले व राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेले शिर्डी देवस्थान ...

West Maharashtra Devasthan Samiti will go to Congress; | पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती काँग्रेसकडे जाणार;

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती काँग्रेसकडे जाणार;

googlenewsNext

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काँग्रेसकडे असलेले व राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेले शिर्डी देवस्थान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आग्रह करून राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून घेतल्याने कोल्हापूरची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर काँग्रेसमधून अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबद्दलची उत्सुकता तयार झाली आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, मुंबईचा सिध्दिविनायक मंदिर ट्रस्ट, शिर्डीचे साईबाबा संस्थान ट्रस्ट आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ही प्रमुख धार्मिक व आर्थिक सत्ताकेंद्रे आहेत. पश्चिम महाराष्ट्र समिती भाजपकडे होती. परंतु राज्य सरकारने ही समितीच बरखास्त केली आहे. शिर्डी व पंढरपूर मंदिरांचे व्यवस्थापन प्रशासक मंडळाकडे होते. त्यातील शिर्डीला दोन आठवड्यात अध्यक्ष निवड करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने हा ट्रस्ट आपल्याकडे घेऊन तिथे आमदार आशुतोष काळे यांची निवडही करून टाकली आहे. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण पैकी ६ आमदार आहेत. त्यामुळे शिर्डी देवस्थान आपल्याच पक्षाकडे हवे, असा आग्रह उपमुख्यमंत्री पवार यांनी धरला होता व त्यानुसार त्यांनी हे देवस्थान राष्ट्रवादीकडे खेचून घेतले. शिर्डी राष्ट्रवादीकडे गेल्याने पंढरपूर देवस्थान काँग्रेसला देण्यात आले. सिध्दिविनायक मंदिर गेली अनेक वर्षे शिवसेनेकडेच असून आदेश बांदेकर त्याचे अध्यक्ष आहेत. राज्यात दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना तब्बल पंधरा वर्षे पंढरपूर व सिध्दिविनायक राष्ट्रवादीकडे, तर शिर्डी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान काँग्रेसकडे होते. त्यातही समतोल होता. त्यामुळे आताही तसाच समतोल साधण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र समिती काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता दाट आहे. काँग्रेस त्यासाठी आग्रही राहू शकते. अहमदनगरमध्ये अजितदादांनी जसा आमदारांचा निकष लावला, तसाच निकष कोल्हापुरात काँग्रेसने लावला तरी त्यांचा दावा बळकट ठरू शकतो. कोल्हापुरात काँग्रेसचे ६ आमदार आहेत.

हे देखील महत्त्वाचे कारण...

शिर्डी संस्थानकडे तब्बल २२०० कोटींच्या ठेवी आहेत. देवस्थानचे सहा हजार कर्मचारी आहेत. वर्षाला तब्बल अडीच कोटी भाविक या देवस्थानला भेट देतात. इतके श्रीमंत देवस्थान राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाकडे कसे ठेवेल, असाही प्रश्न होताच. पश्चिम महाराष्ट्र समितीचा कार्यभार तीन जिल्ह्यात असून २८ हजार एकर जमीन, १३० कोटींच्या ठे‌वी, सुमारे दीडशे कर्मचारी आणि ५० लाख भाविक वर्षाला मंदिरास भेट देतात. तुलनेत पंढरपूरचा विठोबा हा गोरगरिबांचा देव असल्याने या मंदिराकडे कमी संपत्ती आहे. सिध्दिविनायक मंदिर ट्रस्ट सार्वजनिक असून त्यांच्याकडे संपत्ती किती आहे, याबद्दलची अधिकृत माहिती ट्रस्टकडून दिली जात नाही. सुमारे शंभर कोटींपर्यंत या मंदिराचे उत्पन्न आहे.

Web Title: West Maharashtra Devasthan Samiti will go to Congress;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.