कोल्हापुरात २ कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त, तिघे ताब्यात; आठवड्यात दुसरी कारवाई
By सचिन भोसले | Published: November 7, 2022 04:08 PM2022-11-07T16:08:37+5:302022-11-07T16:09:02+5:30
आठवडाभरातच ही दुसरी कारवाई करण्यात आली. या तस्करीमध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता
कोल्हापूर : कोल्हापुरातील बाबुभाई परीख पुल ते मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज, सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने २ कोटी १लाख ५०हजार रुपये किमतीची २ किलो १५ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सापळा रचून जप्त केली. या प्रकरणी कोल्हापुरातील तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
करण संजय टीपुगडे (२७, रा. राम गल्ली कळंबा), संतोष अभिमन्यू धुरी ( कदमवाडी), जाफर सादिक बाणेदार (नवीन वाशी नाका) ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
मागील शुक्रवारी (दि.४) सरनोबतवाडी (ता. करवीर) तील सेवा रस्त्यावर ३ कोटी ४१ लाख ३० हजार रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली होती. यानंतर आठवडाभरातच आज पुन्हा ही दुसरी कारवाई करण्यात आली. या तस्करीमध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.