गाळप झाले बिलाचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:59+5:302020-12-08T04:21:59+5:30
निपाणी : निपाणी सीमाभाग हा उसाच्या शेतीसाठी अतिशय चांगला असल्याने अनेक साखर कारखाने येथील ऊसतोड करण्यासाठी आघाडीवर असतात. येथील ...
निपाणी : निपाणी सीमाभाग हा उसाच्या शेतीसाठी अतिशय चांगला असल्याने अनेक साखर कारखाने येथील ऊसतोड करण्यासाठी आघाडीवर असतात. येथील उसाचा उताराही नऊ ते साडेबाराच्या वर नेहमी पडत असतो. यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखान्यांची ऊसतोडीसाठी झुंबड उडालेली असते. यावर्षीही कारखान्यांनी गाळप केले आहे; मात्र ऊस बिल देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यातच पहिली उचलही जाहीर केली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे कारखानदारांनी लवकरात लवकर ऊस बिले द्यावीत, अशी मागणी होत आहे.
यावर्षीच्या कोरोना महामारी, महापूर व वादळी वाऱ्याने ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी उताऱ्यातही घट झाली असून, ऊसतोड मजूर नसल्याने तोडणीलाही विलंब होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना या भागातील कारखाने मात्र शेतकऱ्यांना ऊस बिल देण्यात अजून विलंब करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी कारखानदारांनी उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत; पण सीमाभागातील कारखाने मात्र ऊस बिल जमा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. एवढेच नव्हे तर अजून पहिली उचलही कारखान्यांनी जाहीर केलेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर जाहीर करून बिलेही अदा केली आहेत; पण सीमाभागातील कारखान्यानी मात्र पहिली उचलही जाहीर केलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पाठविणे व त्यानंतर बिलाची वाट पाहत बसणे एवढेच काम राहिले आहे.
प्रतिक्रिया-
दर किती द्यायचा याबाबत अजून निर्णय झालेला नाही, पण इतर कारखान्यांच्या तुलनेत योग्य दर देऊ. लवकर यावर निर्णय होईल.
चंद्रकांत कोठीवाले
अध्यक्ष हालशुगर
१९६६ च्या साखर कायदा कलम ३ नुसार ऊस तोडणीनंतर १४ दिवसांत बिल अदा करणे गरजेचे आहे. पण दीड महिना झाला तरी कारखानदार बिले अदा करीत नाहीत, हे चुकीचे आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब कारवाई करावी.
प्रा. सचिन खोत
स्वाभिमानी शेतकरी संघटना