शेतकऱ्यांचे घामाचे पैसे ‘महालक्ष्मी’ने बुडवले त्याचे काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:57+5:302021-04-29T04:18:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महिन्याला ३, १३, २३ तारखेला शेतकऱ्यांची बिले देतो. त्यांच्या घामाचे पैसे आहेत, ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महिन्याला ३, १३, २३ तारखेला शेतकऱ्यांची बिले देतो. त्यांच्या घामाचे पैसे आहेत, ते देऊन आम्ही उपकार करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र बोलणाऱ्यांच्या महालक्ष्मी दूध संघाची २, १२, २२ ही बिलाची तारीख असताना, शेतकऱ्यांचे पैसे का बुडवलेत, हे अगोदर सांगावे, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली. राजू शेट्टी यांनी बुधवारी विरोधी आघाडीस पाठिंबा दिला, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावे, यासाठी राजू शेट्टी यांचा संघर्ष असतो, ‘गोकुळ’ने आतापर्यंत शेतकऱ्यांचे हितच जोपासल्याने त्यांनी पाठिंबा दिला. चारशे कोटीच्या ठेवी असणारा ‘गोकुळ’एवढा देशात एकही संघ नाही. आता कोणी काय पण विजयाच्या बाता मारू देत, वाढीव चारशे सभासदांमुळे विजय आमचाच होणार.
धनंजय महाडिक म्हणाले, विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. चेअरमन निवडीची औपचारिकता राहिल्याची भाषा काहीजण करत आहेत, मात्र त्यांना २ मे रोजी समजेल.
शेट्टी शेतकऱ्यांचा ब्रॅण्ड
राजू शेट्टी साधा माणूस नाही, जिल्ह्यातील मोठी असामी आहे. शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठी आस्था असून ते शेतकऱ्यांचा ब्रॅण्ड आहेत. ते एक जादू आहेत. त्यांची किमया २ मे रोजी विरोधकांना कळेल, असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी लगावला.
तीन मंत्र्यांकडून ‘गोकुळ’ बंद पाडण्याचा प्रयत्न
विरोधी आघाडीत तीन मंत्री, खासदार, आमदार अशी अभद्र युती झाली आहे. ते ‘गोकुळ’ बंद पाडतीलच, त्याचबरोबर दूध संस्थांमध्ये राजकारणाचा अड्डा करतील, असा आरोप धनंजय महाडिक यांनी केला.
जिल्हा बँकेला मैत्री कायम राहणार
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीसोबत आणि येथे वेगळी भूमिका कशी? असे शेट्टींना विचारले असता, पी. एन. पाटील हे महाविकास आघाडीतीलच आहेत ना, जिल्हा बँकेची निवडणूक लवकर झाली तर ही मैत्री कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.
लवकरच मोठ्या नेत्याचा पाठिंबा
जिल्ह्यातील इतर नेत्यांंशी पाठिंब्याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच एका मोठ्या नेत्याच्या पाठिंब्याची बैठक होईल. असे पी. एन. पाटील यांनी सांगितले.