संजय कुलकर्णींवर काय कारवाई केली
By admin | Published: February 25, 2016 01:20 AM2016-02-25T01:20:49+5:302016-02-25T01:40:09+5:30
पणन संचालकांची जिल्हा उपनिबंधकांना विचारणा
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे वादग्रस्त कनिष्ठ अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर काय कारवाई केली, याचा अहवाल तातडीने पणन कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.
बाजार समितीमध्ये नोकरीस लागल्यापासून संजय कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून किमान १२ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले. समितीकडे नोकरीस असताना खासगी आर्किटेक्ट म्हणून काम करणे, पत्नीच्या नावे असलेल्या ‘सुशाम एंटरप्रायजेस’ या फर्मच्या नावावर स्वत:च कोट्यवधींची कामे करणे, आदी ठपके चौकशी अधिकाऱ्यांनी कुलकर्णी यांच्यावर ठेवले आहेत. याबाबत मानसिंग ढेरे (चोकाक) यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सहायक निबंधक ए. व्ही. पाटील
यांनी कुलकर्णी यांच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर केला आहे.
त्यामध्ये त्यांनी बारा लाखांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा उपनिबंधकांनी संबंधितांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहेत, पण समिती प्रशासनाने पुढील काहीच कारवाई केली नसल्याने ढेरे यांनी थेट पणन संचालकांकडे तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)