हरित फटाके म्हणजे काय रे भाऊ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:57 AM2020-11-13T11:57:48+5:302020-11-13T12:01:53+5:30
environment , Diwali, crackersban, Sangli, राष्ट्रीय हरित लवादाने कमी आवाज व कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाक्यांना मंजुरी दिली आहे. मात्र बाजारात हरित फटाके म्हणजे काय, हेच कुणाला माहीत नाही. खुद्द विक्रेत्यांना नेमके कोणते फटाके हरित आहेत, याची कल्पना नाही. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघेही संभ्रमात आहेत.
शीतल पाटील
सांगली : राष्ट्रीय हरित लवादाने कमी आवाज व कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाक्यांना मंजुरी दिली आहे. मात्र बाजारात हरित फटाके म्हणजे काय, हेच कुणाला माहीत नाही. खुद्द विक्रेत्यांना नेमके कोणते फटाके हरित आहेत, याची कल्पना नाही. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघेही संभ्रमात आहेत.
फटाके म्हटले की आवाज आणि धूर होणारच; पण यंदा राष्ट्रीय हरित लवादाने हवा प्रदूषणाबाबत सक्त भूमिका घेतली. देशातील १२२ शहरांत फटाक्यांना बंदी घातली. त्यात सांगलीचाही समावेश आहे. अतिप्रदूषित शहर म्हणून सांगलीचा उल्लेख झाला. लवादाच्या निर्णयानंतर नागरिकांत हरित फटाक्यांबाबत उत्सुकता दिसून आली. त्यात महापालिकेने सरसकट फटाके विक्रेत्यांच्या स्टॉलला परवानगी दिली. शहरात हवा प्रदूषणाची पातळी समाधानकारक असल्याचा दावाही करण्यात आला.
पण नेमके हरित फटाके म्हणजे काय? याची माहिती विक्रेत्यांनाही नसल्याची बाब समोर आली. काही नागरिकांनी शहरातील स्टॉलवर हरित फटाक्यांची मागणीही केली, पण फुलझाडे, भुईचक्कर, लहान आवाजाचे फटाके हेच हरित फटाके असल्याचे सांगण्यात आले. बाजारात हरित फटाक्यांच्या व्याख्येबाबत अस्पष्टता दिसून येत होती. दिवाळीच्या आधी दोन महिने फटाक्यांचे बुकिंग केले जाते. त्यामुळे आता निर्णय आल्यानंतर खरेदी केलेला माल कोठे विकायचा, असा प्रश्नही विक्रेते संजय चव्हाण यांनी उपस्थित केला.
हरित फटाके आणायचे कोठून?
फटाक्यांच्या अनेक खोक्यांवर त्या फटाक्यामध्ये असलेल्या घटकांची माहिती दिलेली नाही. काही फटाक्यांवर ग्रीन क्रॅकर्स असे लिहिले आहे. तेच हरित फटाके असल्याचे सांगून विक्री सुरू आहे. वर्षानुवर्षे तेच फटाके विकल्यानंतर एकाएकी हरित फटाके कोठून आणायचे? दिवाळीच्या चार दिवसांत फटाक्याचे प्रदूषण होते; मग वर्षभर वाहनांच्या धुरामुळे जे प्रदूषण होते, त्याचा विचार का केला जात नाही, असा सवालही विक्रेते करतात.